kdcc bank result : “शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती”
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 17:50 IST2022-01-07T17:50:12+5:302022-01-07T17:50:44+5:30
शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच मतदारानी भरभरून मतदान केले. त्या सर्व मतदारांचा मनापासून आभारी आहे.

kdcc bank result : “शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती”
कोल्हापूर : जिल्ह्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल आज जाहीर झाला. सत्तारुढ आघाडीला बँकेवरील सत्ता कायम राखण्यात यश आले. या विजयानंतर बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सत्तारूढ आघाडीचा हा विजय म्हणजे गेल्या सहा वर्षाच्या शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच मतदारानी भरभरून मतदान केले. त्या सर्व मतदारांचा मनापासून आभारी आहे.
शेतकऱ्यांच्या विविध कल्याणकारी योजना राबवित गेल्या सहा वर्षांमध्ये केडीसीसी बँकेने नेत्रदीपक अशी प्रगतीची गरुडझेप घेतली आहे. येत्या काळात सर्व संचालक मंडळ एकोप्याने शेतकऱ्यांच्या हिताचा व कल्याणाचा कारभार करून केडीसीसी बँक ही देशात अग्रस्थानी आणू. तसेच; जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवू.
या निवडणुकीत सत्तारूढ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम केले आणि जीवाचे रान केले. त्या सर्व कार्यकर्त्यांचाही मी ऋणी आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवसेनेने या निवडणुकीत सत्तारुढ आघाडी विरोधात चांगलीच लढत दिली. शिवसेनेने तीन जागावर विजयी मिळवला आहे. धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांचा पतसंस्था गटातून पराभव झाला. सत्तारुढ आघाडीच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनल होते.
या निवडणुकीत २१ जागांपैकी विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्याने १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. ५ तारखेला चुरशीने ९८ टक्के मतदान झाले होते. तर प्रचारसभे दरम्यान जोरदार टीकाटिप्पणीमुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आज निकालानंतर मात्र सर्व चित्र स्पष्ट झाले असून सत्तारुढ आघाडीच्याच हातात पुन्हा बँकेचे सुत्रे गेली. आता अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.