कसबा सांगावला वर्चस्वासाठी काटा लढत
By Admin | Updated: January 20, 2017 23:59 IST2017-01-20T23:59:42+5:302017-01-20T23:59:42+5:30
इच्छुकांची संख्या मोठी : पंचवीस वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण; घाटगे, मंडलिक, घाटगे यांच्या युतीवर येथील राजकीय गणिते अवलंबून

कसबा सांगावला वर्चस्वासाठी काटा लढत
बाबासाहेब चिकोडे --कसबा सांगाव --कागल तालुक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणारा कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सुमारे वीस वर्षांनंतर सर्वसाधारण झाल्यामुळे या मतदारसंघात राजकीय वर्चस्वासाठी काटा लढत होणार असून, इच्छुकांची मांदियाळी या मतदारसंघात झाली आहे. मात्र, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे (शिवसेना) व समरजितसिंह घाटगे (भाजप) यांच्या युतीवर येथील राजकीय गणिते अवलंबून आहेत.
येथे पक्षीय राजकारणापेक्षा गटा-तटाचे राजकारण चालते. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून, तर आमदार हसन मुश्रीफ यांनी विकासकामांतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. वीरेंद्र मंडलिक यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
कसबा सांगाव पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी, तर पिंपळगाव खुर्द पंचायत समिती सर्वसाधारण झाल्याने या ठिकाणी मोठी चुरस होणार आहे. यापूर्वी मंडलिक, मुश्रीफ व दोन्ही घाटगे गट एकत्र असताना या मतदारसंघावर घाटगे गटाचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात मोठा सत्तासंघर्ष घडला आहे. सन २००७ मध्ये आमदार मुश्रीफ व संजय घाटगे एकत्रित येत मुश्रीफ गटाचे युवराज दत्ताजीराव पाटील यांनी दिनकर माळी यांचा पराभव करीत जि. प. चे आरोग्य व बांधकाम सभापतिपद पटकावले होते, तर २०१२ च्या निवडणुकीत आमदार मुश्रीफ व विक्रमसिंह घाटगे यांची युती असतानाही मंडलिक व संजय घाटगे युतीच्या प्रभावती पाटील यांनी युवराज पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांचा पराभव केला होता.
कसबा सांगाव पंचायत समितीमध्ये श्रीकांत ऊर्फ पिंटू लोहार यांनी मुश्रीफ गटाचे विलास भानुसे व अपक्ष भारत कुंभार यांचा पराभव करीत २०१२ मध्ये सभापतिपद पटकावले होते, तर पिंपळगाव खुर्द पंचायत समितीमध्ये विक्रमसिंह घाटगे गटाच्या उल्का तेलवेकर विजयी झाल्या होत्या. संघर्ष आणि चुरस हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य होय. त्यामुळे अत्यंत टोकाचे राजकारण यावेळी पाहायला मिळणार आहे. घाटगे व मंडलिक या दोन गटांच्या विभागणीनंतर संजय घाटगे, मुश्रीफ, विक्रमसिंह घाटगे व मंडलिक असे चार गट तयार झाले. या चारही गटांनी एकमेकांशी अनेकवेळा आलटून-पालटून युती करून निवडणुका लढविल्या आहेत व जिंकल्याही आहेत. मात्र, सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर प्रथमच या निवडणुका होत आहेत. प्रा. संजय मंडलिक यांचा शिवसेना व समरजितसिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश ही आमदार मुश्रीफांची डोकेदुखी ठरली आहे. त्यामध्येच प्रा. मंडलिक, संजय घाटगे व समरजितसिंह हे एकत्र येण्याची शक्यता वाढल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामध्ये
स्वाभिमानी व आरपीआयची रसद महायुतीला मिळाल्यास मुश्रीफ यांना त्यांच्याशी एकाकी सामना करावा लागणार आहे.
या मतदारसंघात जि. प.साठी मुश्रीफ गटाकडून राजेंद्र माने, युवराज पाटील, रमेश तोडकर यांची शिवसेना पक्षाकडून तालुकाप्रमुख शिवगोंडा पाटील, प्रा. मंडलिक गटाकडून कैलास जाधव, बाबगोंडा पाटील, प्रधान भोजे, समरजितसिंह घाटगे (भाजप) गटाकडून डॉ. तेजपाल शहा, वाय. ए. पाटील, अॅड. बाबासो मगदूम, एकनाथ पाटील (भाजप सरचिटणीस), विजयसिंह घाटगे, संजय घाटगे गटाकडून बाबासो लबाजे, धनराज घाटगे, अजितसिंह कदम, भीमगोंडा पाटील, विजयसिंह जाधव तर स्वाभिमानी गटाकडून अविनाश मगदूम, राहुल हेरवाडे, सचिन पाटील हे इच्छुक आहेत.
रणधुमाळी
कसबा सांगाव
कागलचे विद्यमान सभापती श्रीकांत ऊर्फ पिंटू लोहार हे देखील जि. प. साठी मंडलिक गटाकडून इच्छुक आहेत. त्यांनी त्यासाठी जोडण्या सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांना ऐनवेळी आमदार सतेज पाटील यांचा आशीर्वादही लाभू शकतो. त्यामुळे त्यांचाही विचार मंडलिक गट करेल, असे लोहार यांना वाटते.
मतदारसंघातील गावे
कसबा सांगाव जि. प. मतदारसंघ
रणदेवीवाडी, मौजे सांगाव, सुळकूड, कसबा सांगाव, व्हन्नूर, पिंपळगाव (खुर्द), लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, शंकरवाडी, एकोंडी अशा ११ गावांचा समावेश आहे.
कसबा सांगाव पंचायत समिती मतदारसंघात रणदेवीवाडी, मौजे सांगाव, सुळकूड, कसबा सांगाव
पिंपळगाव खुर्द पंचायत समिती मतदारसंघात व्हन्नूर, पिंपळगाव (खुर्द), लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, शंकरवाडी, एकोंडी, आदी गावांचा समावेश आहे.