तीन कर्ते पुरुष गेल्याने कारेकर कुटुंबावर आघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:33+5:302021-05-28T04:18:33+5:30
कोल्हापूर : तिघेही सख्खे भाऊ, एकत्र राहायचे. दरम्यान, कोरोनाचा घरात शिरकाव झाला. एकापाठोपाठ एक असे तिघा भावांचे पाच दिवसातच ...

तीन कर्ते पुरुष गेल्याने कारेकर कुटुंबावर आघात
कोल्हापूर : तिघेही सख्खे भाऊ, एकत्र राहायचे. दरम्यान, कोरोनाचा घरात शिरकाव झाला. एकापाठोपाठ एक असे तिघा भावांचे पाच दिवसातच निधन झाले. उदय रामकृष्ण कारेकर, निळकंठ रामकृष्ण कारेकर, शशिकांत रामकृष्ण कारेकर अशी त्यांची नावे आहेत. कुटुंबातील कर्ते पुरुषच कायमचे गेल्याने कारेकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
कारेकर येथील गुजरीत राहतात. त्यांचा सराफ व्यवसाय आहे. एप्रिल महिन्यात तिघा भावांचे वडील रामकृष्ण कारेकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यानंतर मे महिन्यात याच कुटुंबावर पुन्हा मोठा आघात झाला. रामकृष्ण यांचा दुसऱ्या नंबरचा मुलगा निळकंठ कारेकर यांना कोरोना झाला. या आजाराशी त्यांचा लढा अयशस्वी झाला. ९ मे रोजी वयाच्या ५६ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मोठे भाऊ शशिकांत कारेकर यांनाही कोरोना झाला. उपचार सुरू असतानाच त्यांचाही वयाच्या ५९ वर्षी ११ मे रोजी मृत्यू झाला. या कुटुंबातील दृष्टचक्र येथेच थांबले नाही. सर्वात लहान भाऊ उदय कारेकर यांनाही कोरोना झाला. या आजाराशी त्यांचीही झुंज यशस्वी झाली नाही. १३ मे रोजी वयाच्या ५६ वर्षी त्यांचेही निधन झाले. पहिल्यांदा वृध्दापकाळाने वडील त्यानंतर तीन कर्ते मुलगे गेल्याने कारेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाची झळ अशा प्रकारे अनेक कुटुंबांना बसत आहे. यामुळे प्रत्येकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याची गरज ठळक झाली आहे.