काेल्हापूर चिडीचूप, रस्ते निर्मनुष्य अन् जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:14 IST2021-05-16T13:14:19+5:302021-05-16T13:14:55+5:30
पोलिसांचा पावसातही खडा पहारा

काेल्हापूर चिडीचूप, रस्ते निर्मनुष्य अन् जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन
कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. उद्योगांची धडधड थांबली. बाजारपेठेतील गोंगाट शांत झाला. भाजी मंडईतील लगबग बंद पडली. अवघे रस्ते निर्मनुष्य झाले. दिवसभर केवळ सोसाट्याचा वारा आणि अधून मधून पडणाऱ्या पावसानेच काय तो लॉकडाऊनमधील उधासपणा कमी करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे संक्रमण खूपच वाढले असून रोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ते दीड हजाराच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही अधिक स्पष्ट झाल्या असून रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसाकरिता कडकडीत लॉकडाऊन पुकारला आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.