जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी

By Admin | Updated: December 5, 2014 23:36 IST2014-12-05T20:50:51+5:302014-12-05T23:36:54+5:30

दुपदरीकरणाचा प्रश्न ‘जैसे थै’च : जयसिंगपूर नगरपालिका, पोलीस लक्ष देणार का ?

Jaysingpur traffic congestion | जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी

जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी

संदीप बावचे - जयसिंगपूर -कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या कामातील वारंवार होणारी दिरंगाई, त्यातच जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या दुपदरीकरण रस्त्याचे रखडलेले काम यामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नित्याचाच बनला आहे. वाहतुकीबाबत पोलीस यंत्रणाही अपयशी ठरली असून, लोकप्रतिनिधींनी आता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजे आहे.
बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्त्वांवर सांगली - कोल्हापूर राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय शासनाने घोषित केल्यानंतर रस्त्यामुळे जयसिंगपुरातील शेकडो कुटुंबांचे नुकसान होण्याबरोबरच छोटे व्यवसाय बंद पडण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. २६ वर्षांहून अधिक काळ भरावा लागणारा कर, शिवाय या रस्त्यांमुळे जयसिंगपूर शहराचे दोन भाग पडणार असल्याने विविध पक्ष, संघटना, कृती समितीसह शहरवासीयांचा विरोध झाला. दरम्यान, जयसिंगपुरातून दुपदरी व तमदलगे बायपास मार्गे दुपदरीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. तमदलगे मार्गे चौपदरीकरण करण्याचाही प्रस्ताव पुढे आला आहे.
शहरातून जाणारा उड्डाण पूल रद्द करण्याची मागणीही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्याला पर्याय म्हणून बसवाण खिंड ते अंकली टोल नाक्यापर्यंत आणि चौंडेश्वरी सूतगिरणी ते कुलकर्णी पॉवर टूल्स उदगाव या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे सूचविण्यात आले होते. शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्नही बारगळला आहे.
जून २०१२ मध्ये सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली. वाढलेली वाहनांची बेसुमार संख्या, अरूंद मार्ग, अपघातांचे प्रमाण अशा समस्यांच्या फेऱ्यात हा महामार्ग सापडला असताना या-ना त्या कारणाने ठप्प असणाऱ्या कामामुळे मार्गाची अवस्था दयनीय बनली आहे. मार्ग पूर्णत: गैरसोयीचा बनल्याने अनेक लहान-मोठे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. मुख्य रस्त्याची अशी अवस्था बनली असताना जयसिंगपुरातील दुपदरीकरण रस्त्याचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. शहरातून अवजड वाहने बाहेरून जावी, तसेच रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चौंडेश्वरी फाट्यावरून शिरोळ बायपास मार्गे उदगाव हा रस्ता यापूर्वी करण्यात आला. मात्र, जयसिंगपूर शहरातून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना आज शहरातून बेमालूपणे अवघड वाहनांची ये-जा सुरूच आहे. झेले चित्रमंदिर, बसस्थानक, शिरोळवाडी रस्ता, क्रांती चौक, नांदणी रस्ता, शहा पेट्रोलपंप या ठिकाणी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. सांगली-कोल्हापूर मार्गावरील जनतारा हायस्कूल ते झेले पेट्रोलपंपापर्यंत वाहतुकीला अडथळा येणारी अतिक्रमने काढणे गरजेचे आहे.



पुढाकाराची गरज
चौंडेश्वरी फाटा व उदगाव येथे वाहतूक पोलीस नेमून अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांकडून सातत्य न राहिल्यामुळे अवजड वाहनांची पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे वाहतूक सुरूच आहे.
सध्या कारखाने सुरू असल्याने ऊस वाहतुकीची वाहने रेल्वे स्टेशन रोडने उदगावमार्गे बायपासने शिरोळला जाण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबाबत पोलीस यंत्रणाही अपयशी
ठरली आहे.

उपाय योजना
एस.टी.बसच्या सुमारे सतराशे फेऱ्या जयसिंगपुरातून होतात, शिवाय अन्य वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील क्रांती चौक म्हणून असणाऱ्या या चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.

वाहतुकीच्या दृष्टिकोणातून ज्या उपाययोजना नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी करणे गरजेचे आहे. नित्याच्याच वाहतूक कोंडीमुळे हा चौक गुदमरून गेला आहे.

Web Title: Jaysingpur traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.