जनसुराज्यचे शिवाजी पोवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:02+5:302021-04-05T04:21:02+5:30
खोची : हातकणंगले तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षापासून दूर गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा ...

जनसुराज्यचे शिवाजी पोवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
खोची : हातकणंगले तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षापासून दूर गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत. कारण काँग्रेस पक्षाने नेहमीच कार्यकर्त्यांना मान-सन्मान, आधार दिला आहे. लवकरच अनेकांचा प्रवेश पक्षात होणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यात विकास कामांची गती वाढविली जाईल, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
पंचायत समितीचे माजी सदस्य, मी महाराष्ट्र वडार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, टोप परिसरातील जनसुराज्य पक्षाचे नेते शिवाजीराव पोवार यांनी कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार आवळे बोलत होते.
आमदार आवळे म्हणाले, पक्षबांधणीसाठी नियोजनपूर्वक कार्यक्रम मतदारसंघात राबविला जाणार आहे. ज्येष्ठ, युवा कार्यकर्त्यांना पक्षाची विविध जबाबदारी देऊन त्यांना सक्रिय करण्यात येणार आहे. आगामी सर्वच निवडणुका जोमाने लढविल्या जाणार आहेत.
शिवाजी पोवार म्हणाले, माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी काँग्रेसचे काम केले. त्यानंतर जनसुराज्य पक्षात कार्यरत राहिलो. परंतु विकासाची कामे जोरदार करण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आमदार आवळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची भक्कम मोट बांधून पक्ष मजबूत करण्यास प्राधान्य देणार आहे.
यावेळी मुकुंद पाटील, अक्षय पाटील, रंगराव भोसले, संभाजी पोवार, अर्जुन पोवार, चंद्रकांत भोसले, रमेश पोवार, अविनाश कलगुटगी, अनिकेत गुरव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी-
जनसुराज्यचे शिवाजी पोवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल आमदार राजू आवळे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी रंगराव भोसले, संभाजी पोवार, अर्जुन पोवार, मुकुंद पाटील उपस्थित होते.