कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या विरोधात हे दुर्दैवी - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:07 IST2025-01-28T17:07:05+5:302025-01-28T17:07:19+5:30
उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या विरोधात हे दुर्दैवी - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : शासन पातळीवर हद्दवाढीचा निर्णय घेणार म्हटल्यावर प्रस्तावित गावातील नागरिक आंदोलन करतात. या कारणामुळेच आतापर्यंत हद्दवाढ रखडली आहे. काही लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या आडवे येत आहेत हे दुर्दैवी आहे, असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्त केले. शहराची हद्द वाढवावी, यासाठी आपण आणि आमदार राजेश क्षीरसागर लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांसह अन्य विषयांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. शहरालगतची जी काही गावे आहेत. ती प्राधान्यक्रमाने कोल्हापूर हद्दवाढीत घ्यावीत, अशीच आपली पहिल्यापासून भूमिका आहे. विरोध असल्यानेच हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाला घेण्यात अडचणी येत आहेत.
हद्दवाढ होत नाही, ही खंत आम्हालाही आहे. हद्दवाढ करणार असे शासन म्हटल्यानंतर हद्दवाढ विरोधातील मोर्चा काढतात. हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी इच्छाशक्ती खंबीर पाहिजे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच नगरविकास मंत्रिपद आहे. त्यांना मी आणि आमदार क्षीरसागर पुन्हा भेटून हद्दवाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी करू.
ताकद असेल तिथे स्वबळावर..
महापालिका निवडणुकीत ज्या प्रभागात पक्षाची ताकद असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवली जाईल, जिथे कमी पडू तेथे महायुतीची मदत घेतली जाईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत अजून आरक्षणाचा विषय मिटलेला नाही. ते स्पष्ट झाल्यानंतरच पुढील निर्णय घेता येईल.