Kolhapur: ‘ती माझी सही नाही; माझा टक्केवारीत सहभाग नाही’; ड्रेनेजलाइन कामातील घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांचे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:22 IST2025-07-29T16:20:32+5:302025-07-29T16:22:17+5:30
यासंबंधीची सर्व कागदपत्रे एकत्र करण्यात आली

Kolhapur: ‘ती माझी सही नाही; माझा टक्केवारीत सहभाग नाही’; ड्रेनेजलाइन कामातील घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांचे खुलासे
कोल्हापूर : ड्रेनेजलाइनचे काम न करताच ७२ लाख उचलल्याप्रकरणात ‘आपला सहभाग नाही, माझी सहीच नाही, माझ्या लॉगीनचा कोणीतरी गैरवापर केला’, असे सांगण्याचा खटाटोप आता महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या प्रकरणात संशयाच्या जाळ्यात सापडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपले खुलासे प्रशासनाकडे सादर केले. त्यात प्रत्येकाने ‘मी त्यात नाही, माझी चूक नाही’, असे नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कसबा बावडा येथील ड्रेनेजचे काम न करताच ७२ लाखांचे बिल उचलून महापालिकेची फसवणूक केल्याचे प्रकरण चर्चेत आहे. पालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडल्याने प्रशासनही हादरून गेले आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात सर्वांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासे मागविले आहेत.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी बजावलेल्या नोटीसनुसार तत्कालिन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, वरिष्ठ लेखापरीक्षक वर्षा परिट, उपशहर अभियंता रमेश कांबळे, लेखाधिकारी संजय सरनाईक, पवडी अकौंट्स विभागातील उपअधीक्षक बळवंत सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी त्यांचे खुलासे सोमवारी रचना व कार्य पद्धती विभागाकडे जमा केले. यासंबंधीची सर्व कागदपत्रे एकत्र करण्यात आली आहेत.
चौकशीचा भाग असल्याचे कारण देत त्यांचे खुलासे गोपनीय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. तथापि या प्रकरणात आपला काहीच दोष नाही, माझा या प्रकरणाशी काही संबंधही नाही, कागदपत्रावर झालेल्या सह्या आपल्या नाहीत, ऑनलाइन लॉगीनचा कोणी तरी गैरवापर केला असावा, असे सांगण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. प्रकरण अंगलट आल्यामुळे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न काहींनी केला आहे.
या प्रकरणाचा तपास अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर करत आहेत. महापालिकेतील सध्याच्या कामाचा व्याप, बैठका, भागातील फिरती ही सगळी उठाठेव करून चौकशीचे काम किती जलदगतीने करणार हे आठ दिवसात कळणार आहे. कारण चौकशी अहवाल आठ दिवसात देण्याचे आदेश प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी समितीला दिले आहेत.