Kolhapur: पर्यटन महामंडळाने गाशा गुंडाळला, पन्हाळगडावरील हॉटेल, रेस्ट हाऊसची दुरवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:47 IST2025-02-01T16:47:37+5:302025-02-01T16:47:54+5:30
देणी थकल्याने कारभार ठप्प

Kolhapur: पर्यटन महामंडळाने गाशा गुंडाळला, पन्हाळगडावरील हॉटेल, रेस्ट हाऊसची दुरवस्था
नितीन भगवान
पन्हाळा : महाराष्ट्र पर्यटन महामंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना पन्हाळगडावर ३० वर्षांची देणी थकल्याने महामंडळाच्या हॉटेल, खोल्या जैसे थे अवस्थेत टाकून गाशा गुंडाळावा लागला आहे. सध्या या जागांची दुरवस्था झाली असून, तेथे अवैध प्रकार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष घालत पुन्हा पर्यटकांसाठी महामंडळाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
पन्हाळगडावर पर्यटकांचा ओघ वाढत असल्याने शासनाने पर्यटन महामंडळाला गडावर तीन जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. याठिकाणी पर्यटन महामंडळाने पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला सि. स. नंबर १/६४ सुमारे एक एकर जागेवर आठ खोल्या बांधल्या. ही प्रशस्त अशी मध्यवस्तीत जागा आहे तर दुसरी जागा सज्जा कोठीजवळ असून, याठिकाणी दोन खोल्या बांधल्या आहेत. तिसरी जागा बाजीप्रभू पुतळ्यापासून धान्य कोठाराकडे जाताना डाव्या बाजूला सि. स. नंबर ६३४ मध्ये सुमारे साडेतीन एकर जागेत पर्यटकांना राहण्यासाठी दहा खोल्या, हाॅल, हाॅटेल असे बांधकाम केले आहे.
पन्हाळा येथे पर्यटन महामंडळातर्फे सन १९५८ मध्ये या निवासी खोल्यांचे बांधकाम केले. हे सर्व महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने १९८० पर्यंत व्यवस्थित चालवले. मात्र, याची देखभाल-दुरुस्ती करायला जमत नसल्याने तीनही ठिकाणच्या जागा महामंडळाने ३० वर्षे कराराने खासगी कंत्राटदाराला चालविण्यास दिल्या. कंत्राटदाराने मंडळाचे भाडे व नगर परिषदेकडील वाणिज्य घरफाळा भरला नाही. कराराचा भंग झाल्याने मंडळाने जागा आपल्या ताब्यात घेतली. पण नगर परिषदेकडील कर भरला नसल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि सर्वच कारभार ठप्प झाला. चुकीच्या पद्धतीने खासगीकरण झाल्याने येथील पर्यटकांचा राबता मोडीत निघाला.
महामंडळाच्या सर्वच खोल्या आता ओस पडल्या असून, गैरकामाचे अड्डे झाले आहेत. पन्हाळगडावरील पोलिस याठिकाणी येत नसल्याने हा परिसर धोकादायक बनला आहे.
पर्यटन महामंडळाचे कार्यालय पुण्यात गेले असून, सध्या कोल्हापूर विभागाच्या मुख्याधिकारी मौसमी कोसे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, महामंडळाला पन्हाळगडावर मिळालेल्या जागा भाडेतत्वावरील असल्याने याठिकाणी महामंडळाला निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे याठिकाणी महामंडळ काहीही करू शकत नाही.
नगर परिषदेचा घरफाळा व अन्य देणे सुमारे २० लाख रुपये थकले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने करार संपुष्टात आला तरीही बेकायदेशीरपणे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या जागेत वीज, पाण्यासह धान्य कोठाराजवळील जागेत खासगी हाॅटेल अस्तित्वात आहे. त्याला पायबंद घालू शकत नाही. - चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी