‘आयआरबी’ही उतरणार ताकदीने
By Admin | Updated: May 31, 2014 01:17 IST2014-05-31T00:59:38+5:302014-05-31T01:17:41+5:30
‘अभी नहीं, तो कभी नहीं’ : टोल सुरू करण्याची सर्व सूत्रे म्हैसकर यांच्या हाती

‘आयआरबी’ही उतरणार ताकदीने
संतोष पाटील-कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा परिणाम, टोलविरोधी कृती समितीला सत्ताधार्यांचे मिळालेले पाठबळ, कृती समितीतून शिवसेनेने मांडलेला सवता सुभा, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे वेगळे आस्तित्व दाखविण्याची धडपड, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आदींमुळे यावेळी टोल आंदोलनाची धार वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आयआरबीनेही टोलवसुलीसाठी ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. अतिशय सावध पावले टाकत आयआरबी टोल वसुलीची सर्व यंत्रणा राबवत असून टोल केव्हा सुरू करावयाचा याची सर्व सूत्रे आयआरबीचे प्रमुख व कार्यकरी संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी स्वत:कडे घेतली आहेत. कृती समितीने ९ जूनला महामोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. मोर्चाच्या अनुषंगाने शहर व जिल्ह्यात टोलविरोधात रान उठविले जात आहे. कोल्हापुरातील राजकीय घडामोडी, त्याचा टोल आंदोलनावर होणारा परिणाम, कृती समितीची तयारी, शिवसेनेचा संभाव्य आक्रमकपणा आदी कोल्हापुरात घडणार्या दिवसभरातील सर्व घडामोडींचा अहवाल थेट आयआरबीच्या कार्यकारी संचालकांकडे पाठविला जातो. एकूण परिस्थीतीचा अंदाज घेऊनच ते कधी टोल सुरु करावयाचा याचा निर्णय घेणार आहेत. केंद्रात झालेले सत्तांतर व येणार्या विधानसभेनंतर राज्यातही खुर्चीपालट होण्याची शक्यता यामुळे टोल वसुलीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या तयारीतच आयआरबी उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे टोलवसुलीची २८ मे ही तारीख पोलीस प्रशासनाला कळवलेली तारीख उलटली तरी आयआरबी टोलवसुलीस विलंब लावत असल्याचे जाणकारांचे मत आहे. कारण आता आंदोलनामुळे टोलवसुली बंद पडल्यास पुन्हा सुरू करणे मुश्किल आहे तसेच पोलिसांच्या मदतीशिवाय टोलवसुली अशक्य असल्याचेही जाणीव आयआरबीला आहे. त्यामुळे न्यायालयाने पुरेसा व त्वरित पोलीस बंदोबस्ताचे आदेश देऊनही पोलीस प्रशासनाने केलेली नाक्यावर विश्रांतीसाठी शेड, स्वच्छतागृहे, पोलिसांना नाष्टा व जेवण पुरविण्याची मागणी आयआरबीने हसतमुखाने मान्य केली आहे. टोल सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी व परिस्थिती कशी आहे, याचा दररोज आढावा घेण्यासाठी आयआरबीच्या वरिष्ठांची टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे. आयआरबीसाठी कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पाची रक्कम महत्त्वाची नसून टोलवसुलीतून आयआरबी कशाप्रकारे माघार घेते यावर कंपनीची बाजारातील पत वाढणार व घटणार आहे. त्यामुळेच कोल्हापुरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या आयआरबीच्या सर्वेसर्वा वीरेंद्र म्हैसेकर यांनी व्यस्त दीनचर्येतही येथील टोलवसुलीची सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत.