आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात ‘रमा’ची पंचगिरी
By Admin | Updated: March 8, 2017 00:16 IST2017-03-08T00:16:08+5:302017-03-08T00:16:08+5:30
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिची पंच म्हणून निवड झाली.

आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात ‘रमा’ची पंचगिरी
सचिन भोसले -- कोल्हापूर रांगडा खेळ म्हणून फुटबॉलबरोबर हॉकीकडेही पाहिले जाते. याच हॉकीमध्ये पुणे येथे एका सराव सामन्यात पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली अन् हॉकीपटूची पुढे आंतरराष्ट्रीय हॉकी पंच झाली, अशी ही कोल्हापूरची रमा पोतनीस आज महाराष्ट्रातील एकमेव हॉकी महिला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी करीत आहे.
रमाने २००७ साली कोल्हापूर पब्लिक स्कूलमधून हॉकी खेळण्यास प्रारंभ केला. पुढे न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलकडून तिने राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले. यातही तिने सुवर्णपदक मिळवून दिले. पुढे तिने खेळाबरोबर पंचगिरीतही रस घेतला. हॉकी महाराष्ट्रकडून २०१४ ला ती राष्ट्रीय पंच परीक्षाही उत्तीर्ण झाली. रमाचा पंचगिरीचा आलेख चढता राहिला. फेबु्रवारी २०१६ ला गुवाहाटी येथे साऊथ एशियन गेम्समध्ये आॅक्टोबर २०१६ मध्ये स्पेन (व्हेलेन्सिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिची पंच म्हणून निवड झाली.
आई गौरी व वडील प्रमोद यांनी प्रत्येक टप्प्यावर मला मुलासारखे प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी आज एक जिल्हास्तरीय खेळाडू ते आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्यांचा विश्वास सार्थ ठरवित आहे. .
- रमा पोतनीस, हॉकी पंच