कोल्हापूरचे पाच फुटबॉलपटू भेटणार लिओनल मेस्सीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:28 IST2025-12-10T19:28:00+5:302025-12-10T19:28:31+5:30
प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत आर्यन, आराध्य, रुद्र, साक्षी, दिव्या यांना शिष्यवृत्ती

कोल्हापूरचे पाच फुटबॉलपटू भेटणार लिओनल मेस्सीला
कोल्हापूर : ‘स्कॉलरशिप ऑफ प्रोजेक्ट महादेवा’ या नावाने राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कोल्हापुरातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये तीन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सी यांच्या हस्ते या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या या खेळाडूंना मुंबईत मेस्सीसोबत अर्ध्या तासाची भेट घेण्याची संधी मिळणार असून, त्यांना त्याच्याकडून फुटबॉलचे धडे मिळणार आहेत.
राज्यात फुटबॉलचा विकास, प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे १३ वर्षांखालील मुले व मुली यांच्यासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्यातील ३० मुले आणि ३० मुली यांची अंतिम निवड मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीतून झालेली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातून आर्यन सचिन पोवार (महाराष्ट्र हायस्कूल), आराध्य नागेश चौगले (महाराष्ट्र हायस्कूल), रुद्र मकरंद स्वामी (सेंट झेव्हिअर्स हायस्कूल) या मुलांची;
तर दिव्या सतीश गायकवाड (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी), साक्षी संदीप नावळे (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी) या मुलींची निवड झालेली आहे. जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस तसेच कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे नोव्हेंबरमध्ये जिल्हा आणि विभागीय पातळीवरील निवड चाचणी येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडासंकुलात घेण्यात आलेली होती. जिल्ह्यातून सात मुले आणि सहा मुली यांची निवड चाचणीतून राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड झालेली होती.
पुढील पाच वर्षांसाठी खेळाडूंचे पालकत्व
राज्य सरकार या खेळाडूंचे या प्रकल्पांतर्गत पुढील पाच वर्षांसाठी संपूर्णपणे पालकत्व घेणार आहे. त्यांचे शिक्षण, फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण तसेच निवासाची व्यवस्था यांचा यात समावेश आहे. या योजनेतून उत्कृष्ट खेळाडू निर्माण करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा हेतू साध्य करण्यात येणार आहे.