परगावाहून आलेल्या व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:49 IST2021-04-06T19:47:52+5:302021-04-06T19:49:03+5:30
CoronaVirus Kolhapur- अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्या व्यक्तीने सक्तीने सात दिवस संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक राहील. गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करावी. त्यासाठी ग्राम व प्रभाग समितीने सतर्क व्हावे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाई करा, तलाठी, ग्रामसेवक आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी मतदान केंद्रनिहाय लसीकरणाबाबत नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी केली.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कोल्हापूर : अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्या व्यक्तीने सक्तीने सात दिवस संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक राहील. गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करावी. त्यासाठी ग्राम व प्रभाग समितीने सतर्क व्हावे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाई करा, तलाठी, ग्रामसेवक आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी मतदान केंद्रनिहाय लसीकरणाबाबत नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. उषादेवी कुंभार, तहसीलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना गावे वाटून द्यावीत. ग्राम, प्रभाग समित्या सक्रिय करून सुविधा उपलब्ध करा. त्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे नियोजन, प्रबोधन, संसर्ग वाढू नये यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी, गावातील सभागृह, शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरण सुरू करणे आदी प्रभावीपणे राबवा.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या घराबाहेर त्याबाबत फलक लावला पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्रात इली, सारी याबाबत सर्वेक्षण करायला हवे. त्याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन करा, असे सांगितले.