बेमुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:38+5:302021-09-18T04:25:38+5:30
पन्हाळा परिसरात बिबट्याचा खुलेआम वावर लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : विक्रम पाटील पन्हाळा : शाहूवाडी तालुक्याचा बहुतांश भाग हा ...

बेमुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत
पन्हाळा परिसरात बिबट्याचा खुलेआम वावर
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : विक्रम पाटील
पन्हाळा : शाहूवाडी तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ असल्यामुळे या परिसरात बिबट्यासह जंगली प्राण्यांचा शिरकाव शेती शिवारासह लोकवस्तीमध्ये वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. गव्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. लोकवस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने डोंगर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकामे करताना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे.
वन्यप्राणी डोंगरदऱ्या सोडून लोकवस्तीत खुलेआम शिरकाव करत आहेत, हा एक चिंतनाचा विषय बनला आहे. पन्हाळा शाहूवाडी परिसर घनदाट जंगल व झाडाझुडपांचा परिसर म्हणून ओळखला जात होता. परंतु, दिवसेंदिवस बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगले रिकामी होत चालली असून, डोंगर परिसर भकास झाला आहे. वन अधिकाऱ्यांचा कृपाशिर्वाद व दुर्लक्षामुळे जंगली प्राण्यांची शिकार दिवसागणिक वाढत असल्याने जंगली प्राण्यांची अन्नसाखळी तुटत चालली आहे. बिबट्यासारख्या प्राण्याला पोट भरण्यासाठी डोंगरभागात शिकार सापडत नसल्यामुळे तो लोकवस्तीत शिरकाव करत आहे.
फोटो किंवा सर्कशीमध्ये पाहायला मिळणारे वन्यप्राणी आता प्रत्यक्षात लोकांच्या समोर येऊ लागले आहेत. लोकांच्या हेटाळणीमुळे कळपातील गवा रेड्यासारखे प्राणी बिथरून हिंस्र बनत लोकांवर थेट जीवघेणा हल्ला करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गव्यांचे प्रमाण बाजारभोगाव - काळजवडे या परिसरात जास्त असल्याने जांभाळी - कासारी खोरा भीतीच्या छायेखाली वावरत आहे. मुख्य रस्त्यावरून रात्रीचा प्रवास करणेदेखील अनेकजण टाळत आहेत.
वन विभागाचे अधिकारी मात्र शासकीय योजनांचा कागदी घोडा नाचवून कारवाईचा दिखावा करत असल्याने दिसते. लोकांमधून वन विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. शतकोटी योजनेच्या नावाखाली लावलेली झाडे संपुष्टात आली असून, वनतळ्यांचे फक्त अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तर वन्यप्राणी शेती शिवारात येऊ लागल्याने पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान होऊनदेखील तुटपुंज्या मदतीची बोळवण करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.