जयसिंगपुरात शंभर टक्के लसीकरणासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:26+5:302021-04-05T04:21:26+5:30
जयसिंगपूर : शहरात शंभर टक्के लोकांचे कोविडचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन नोंदणी ...

जयसिंगपुरात शंभर टक्के लसीकरणासाठी पुढाकार
जयसिंगपूर : शहरात शंभर टक्के लोकांचे कोविडचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, जयसिंगपूर शहराबरोबर तालुक्यातही लसीकरणाला वेग वाढविण्यासाठी प्रशासन पातळीवर नियोजन केले जात आहे.
शिरोळ तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय, आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३३ उपकेंद्रे आहेत. प्रशासनाने कोविड लसीकरणाची मोहीम हाती घेतली असलीतरी लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी आढावा बैठकीत सूचना दिल्या होत्या. तालुक्यात लसीकरण युद्धपातळीवर करावे, अशा सूचना देण्यात आल्यानंतर जयसिंगपूर पालिकेने बारा प्रभागात शंभर टक्के लोकांचे कोविडचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांना घरोघरी जाऊन नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात बारा प्रभाग असून नगरसेवकांच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. शहरात सध्या २३ कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणाबाबत तालुका पिछाडीवर असल्याची खंत व्यक्त केल्यानंतर प्रशासन यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.
-----------
चौकट - शिरोळमध्ये कोरोना सेंटरची गरज
तालुक्यात जवळपास ४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण यापूर्वी आढळून आले होते. तर २०० जणांचा मृत्यू झाला होता. सध्या तालुक्यात शासकीय पातळीवर कोरोना सेंटर नसल्याने सामान्य रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे उदगांव कुंजवन येथे कोरोना सेंटर सुरु करावे, अशी मागणी होत आहे.