खेडोपाडीच्या पाण्याचा होणार हिशेब, इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत
By समीर देशपांडे | Updated: February 11, 2025 12:16 IST2025-02-11T12:16:21+5:302025-02-11T12:16:37+5:30
इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत

खेडोपाडीच्या पाण्याचा होणार हिशेब, इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत
समीर देशपांडे
कोल्हापूर : प्रचंड पाण्याचा उपसा, तितकीच प्रचंड वीजबिले, मोठी गळती आणि इतके करूनही अशुद्ध आणि अपुऱ्या पाण्याचा पुरवठा. राज्यातील हे पाणीपुरवठा विषयक चित्र बदलण्यासाठी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कंबर कसली आहे. ‘आयओटी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता एखाद्या गावाने नदीतून पाणी उचलले किती आणि गावातील शेवटच्या ग्रामस्थाला ते मिळाले की नाही, इथपर्यंतची माहिती आता संकलित करण्यात येणार आहे.
२०१९ साली जाहीर करण्यात आलेल्या जलजीवन मिशनमधील योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. माणसी प्रतिदिनी ५५ लिटर शुद्ध पाण्याचे उद्दिष्ट ठेवून या जलजीवनच्या नव्या योजना आखण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही अनेक ठिकाणी दर्जाहीन कामांमुळे गळती मोठ्या प्रमाणावर सुरू राहते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही या योजना १०० टक्के फलद्रूप ठरत नाहीत, म्हणूनच आता गावागावातील पाण्याचा हिशाेब मांडला जाणार आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत
इंटरनेटच्या माध्यमातून मोठी संख्यात्मक माहिती इतर घटकांना पाठवण्यासाठीच्या तंत्रज्ञान पद्धतीने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हटले जाते. याच माध्यमातून आता एखाद्या पाणी योजनेतून गावासाठी नदीतून नेमके किती पाणी उचलले हे फ्लो मीटरच्या साहाय्याने मोजण्यात येईल. त्यातील किती पाणी वाहून नेऊन गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पडले, तेथून ते सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे समान प्रमाणात वितरित झाले की नाही, याची संपूर्ण माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे.
पाण्याची शुद्धता ही कळणार
ही माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण केले असताना, पाण्याची शुद्धता, त्यामध्ये टीसीएलचा वापर किती यांसह पाण्याला येणारा वास या गोष्टींचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असेल, तर ते थांबवणे शक्य होणार आहे. यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, विविध सिग्नल्सच्या माध्यमातून पाण्याच्या वितरणाचे आणि दर्जाचे विश्लेषण करण्यात येणार आहे. उचलले तितकेच पाणी गावात पोहोचले नसेल, तर नेमका पाण्याचा अपव्यव कुठे होतो, हेदेखील या माध्यमातून समजणार आहे.