आवक घटली, कांदा दर उतरला, सौदे सुरळीत : बाजार समितीतील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:04 IST2020-09-24T18:02:07+5:302020-09-24T18:04:04+5:30
बाजार समितीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आणि दर उतरले तरी गुरुवारी सौदे मात्र सुरळीत निघाले. बुधवारी दर पडल्याचा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी गोंधळ घालत कांद्याचे सौदे बंद पाडले होते.

आवक घटली, कांदा दर उतरला, सौदे सुरळीत : बाजार समितीतील चित्र
कोल्हापूर : बाजार समितीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आणि दर उतरले तरी गुरुवारी सौदे मात्र सुरळीत निघाले. बुधवारी दर पडल्याचा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी गोंधळ घालत कांद्याचे सौदे बंद पाडले होते. समिती प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सौदे पूर्ववत झाले होते. कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून बाहेर काढल्यानंतर सर्वत्र कांद्याचे दर दुपटीने वधारले आहेत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र दर उतरला आहे.
कांद्याची आवक बुधवार (दि. २३)च्या तुलनेत दोन ते अडीच क्विंटलनी घटली आहे. गुरुवारी आठ हजार ६७३ क्विंटल आवक झाली. बुधवारी हीच आवक १० हजार ७७४, तर मंगळवारी आठ हजार ८२३ होती. दर क्विंटलमागे ६० रुपयांनी कमी झाले आहेत. बुधवारी किमान दर १००, तर कमाल ४२० रुपये, सरासरी २६० रुपये क्विंटल होते. गुरुवारी यात घट होऊन किमान १००, तर कमाल ४००, तर सरासरी २०० रुपये इतका राहिला.
कोल्हापूर बाजार समितीत स्थानिक कांदा येत नाही. लासलगाव, नाशिक, सोलापूर, कर्नाटक येथून कांदा सौद्यांसाठी येतो. येथे दर चांगला मिळत असल्यानेच शेतकरी प्राधान्य देतात. यातून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून लाखो रुपये मिळतात. तथापि कमी दरावरून येथेही खटके उडू लागले आहेत. इतर बाजार समित्यांमध्ये दर वाढत असताना कोल्हापुरात कमी दराने सौदे निघत असल्याने बाहेरील शेतकऱ्यांनी माल पाठविताना हात आखडता घेतला.