उद्योगाला ‘डिजिटल’ची जोड आवश्यक: मनोज कोटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:43 IST2018-09-09T23:43:40+5:302018-09-09T23:43:45+5:30

उद्योगाला ‘डिजिटल’ची जोड आवश्यक: मनोज कोटक
कोल्हापूर : विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्यामुळे बदलत्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवण्यासह तो वाढवायचा असल्यास त्याला ‘डिजिटल मार्केटिंग’ची जोड देणे आवश्यक आहे. उद्योजक, व्यावसायिकांनी आॅफलाईन आणि आॅनलाईनमध्ये समतोल साधून कार्यरत राहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज कोटक यांनी रविवारी येथे केले.
येथील आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरतर्फे आयोजित लाईव्ह आयटी फोरममध्ये ‘डिजिटल मार्केटिंग २.०’ या विषयावर कोटक यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असो.च्या माधवराव बुधले सभागृहातील या कार्यक्रमास ‘आयटी असोसिएशन’चे अध्यक्ष ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष विश्वजित देसाई प्रमुख उपस्थित होते. कोटक म्हणाले, डेस्कटॉप ते स्मार्टफोन आणि ई-मेल ते व्हॉट्स अॅपपर्यंत तंत्रज्ञान येऊन पोहोचले आहे. तंत्रज्ञानातील बदलामुळे उद्योग-व्यवसायाचे स्वरूपही बदलत असून, नव्या संधीही मिळत आहेत. या संधी साधण्यासह प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी उद्योग-व्यवसायाला डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंगची जोड आवश्यक आहे. कार्यक्रमास ‘आयटी असोसिएशन’चे सचिव प्रसन्न कुलकर्णी, खजानीस स्नेहल बियाणी, कौस्तुभ नाबर, मनीष राजगोळकर, संजीव शिवापूरकर, गिरीश आरेकर, आदी उपस्थित होते. अद्वैत दीक्षित यांनी स्वागत केले. विक्रांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रणजित नार्वेकर यांनी आभार मानले.
भीती नव्हे, गरज
भीती घालत नाही; पण तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांतील बदल पाहता डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंग अंगीकारणे गरजेचे असल्याचे कोटक यांनी सांगितले. ते म्हणाले, केवळ हे तंत्रज्ञान, मार्केटिंग अंगीकारून चालणार नाही, तर त्यामध्ये अद्ययावत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या विषयाबाबत दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून मी आतापर्यंत मुंबई, पुणे, बडोदा, सांगली, कोल्हापूरमध्ये मार्गदर्शन केले आहे.
उद्योजक, व्यावसायिकांनी हे करावे
सर्वांत पहिल्यांदा आपल्या उद्योग-व्यवसायाचे संकेतस्थळ तयार करावे.
संकेतस्थळ, मोबाईल अॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात राहावे.
गुगल, फेसबुक, व्हॉट्स अॅप, आदींमधील बदल वेळोवेळी जाणून घेऊन अद्ययावत राहावे.
डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंग लक्षात घेऊन आपले
उद्योग-व्यवसायाचे धोरण ठरवावे.
हे धोरण ठरविताना दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून राहू नये.