उद्योग केंद्राची प्रक्रिया ‘युझर फे्रंडली’ बनविणार-थेट संवाद
By Admin | Updated: November 12, 2014 23:21 IST2014-11-12T22:08:23+5:302014-11-12T23:21:23+5:30
स्वयंरोजगार, उद्योगवाढीला बळ देणार : एस. जी. राजपूत

उद्योग केंद्राची प्रक्रिया ‘युझर फे्रंडली’ बनविणार-थेट संवाद
‘स्वयंरोजगार करा... स्वावलंबी व्हा...’ असा संदेश देत उद्योगांचे विकेंद्रीकरण करून मागासलेल्या भागात उद्योगवाढीस चालना देणे. उद्योगवाढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासह औद्योगिकीकरणात समन्वयक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र भूमिका बजाविते. या केंद्राने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, स्वयंरोजगार वाढीला दिलेले बळ, राबविलेल्या योजना, भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत केंद्राचे नूतन महाव्यवस्थापक एस. जी. राजपूत यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : जिल्हा उद्योग केंद्राने स्वयंरोजगाराला कसे बळ दिले आहे?
उत्तर : बेरोजगारांसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुधारित बीजभांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविली जाते. स्वयंरोजगार निर्मितीसाठी गेल्या पंधरा वर्षांत बीज भांडवलांतर्गत १ हजार १९५ जणांना ३९ कोटी ७६ लाखांची कर्जे, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत १७२ जणांना ३ कोटी ५ लाखांचे कर्ज, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत ४४८ जणांना ३८ कोटी ७१ लाखांचे कर्ज वितरीत केले आहे. शिवाय १६ हजार ७४५ जणांना उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.
प्रश्न : उद्योगवाढीसाठी कोणत्या योजना कार्यन्वित आहेत?
उत्तर : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी प्रस्तावित, स्थापित उद्योगांसाठी अनुक्रमे भाग एक व दोन अशी नोंदणी केली जाते. लघुउद्योगांच्या वाढीसाठी राज्य शासनाचे औद्योगिक धोरण २०१३ अंतर्गत सामूहिक प्रोत्साहन योजना कार्यान्वित आहे, शिवाय संबंधित योजनेंतर्गत विक्रीकर परतावा, व्याज अनुदान, मुद्रांकशुल्क, विद्युत बिलात परतावा, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनांतर्गत अनुदान दिले जाते. क्वॉलिटी सर्टिफिकेट, क्लिनर प्रॉडक्शन मेजर, के्रडिट रेटिंग एनर्जी, वॉटर आॅडिट आदींबाबत विविध स्वरूपात प्रोत्साहन दिले जाते. केंद्र सरकारतर्फे सूक्ष्म, लघुउद्योगांसाठी औद्योगिक समूहाची योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोगॅ्रम) राबविली जाते तसेच औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, विकासासाठी पायाभूत सुविधांची योजना कार्यान्वित आहे. उद्योगांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षांत तीन हजार उद्योगांना ४४१ कोटी विशेष भांडवलासाठी अनुदान दिले आहे.
प्रश्न : जिल्ह्यातील उद्योगांसाठी काय केले आहे?
उत्तर : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसाठी फौंड्री क्लस्टर, पारंपरिक गूळ उत्पादकांसाठी क्लस्टरशिवाय कोल्हापूरची वेगळी ओळख असलेली चप्पल, तसेच हुपरी येथील चांदी व्यवसायाला आणि इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला बळ देण्यासाठी गारमेंट क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. त्याच्या प्रारंभाची प्रक्रिया सुरू आहे. नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध स्वरूपातील पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. उद्योगांच्या अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठका घेतल्या जातात. आजारी उद्योगांचे पुनर्वसन करण्यासाठी समिती कार्यरत आहे. त्यात त्यांची देणी, थकबाकी कर्जात रूपांतरीत केली जाते, शिवाय मोठ्या आणि मेगा उद्योगांचे सनियंत्रण केले जाते.
प्रश्न : राज्याच्या तुलनेत कोल्हापूरची स्थिती कशी आहे?
उत्तर : जिल्हा उद्योग केंद्राकडे २५ हजार उद्योगांची नोंदणी आहे. त्यात सहकारी, खासगी उद्योगांचा समावेश आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापूरची औद्योगिक स्थिती समाधानकारक आहे. साधारणत: दरवर्षी स्वयंरोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १२५, तर सुधारित बीजभांडवल योजनेद्वारे १०० जणांना कर्जाच्या स्वरूपात साहाय्य केले जाते. सध्या सर्वच क्षेत्रांत संगणकीकरण गरजेचे बनले आहे. ते लक्षात घेऊन जिल्हा उद्योग केंद्राला ‘अपडेट’ केले जाणार आहे. केंद्र ‘डेटाबेस’च्या माध्यमातून अधिक सदृढ केले जाणार आहे. अर्ज करणे, कर्जे मिळविणे अशा स्वरूपातील प्रक्रिया अधिक ‘युझर फे्रंडली’ करण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्य पातळीवरील ‘आॅनलाईन’ प्रक्रियेचे काम सुरू आहे. स्थानिक पातळीवर उद्योग केंद्राची वेबसाईट निर्मिती नियोजित आहे. केंद्रातील कामकाज गतीने होण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.
- संतोष मिठारी