कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:46 PM2020-08-17T13:46:58+5:302020-08-17T13:48:49+5:30

कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांनी उत्साही वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्रदिन साजरा केला. घरांच्या दारांमध्ये रांगोळ्या, तर शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये फुगे, फुले, आदींच्या माध्यमांतून आकर्षक तिरंगी सजा‌वट करण्यात आली होती. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने उत्साहात आणखी भर पडली. सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या संदेशांचा वर्षाव झाला.

Independence Day celebrations by Kolhapurites | कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next
ठळक मुद्देकोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांकडून स्वातंत्र्यदिन उत्साहातफुगे, रांगोळीने आकर्षक सजावट : सोशल मीडियावर संदेश

कोल्हापूर : कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांनी उत्साही वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्रदिन साजरा केला. घरांच्या दारांमध्ये रांगोळ्या, तर शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये फुगे, फुले, आदींच्या माध्यमांतून आकर्षक तिरंगी सजा‌वट करण्यात आली होती. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने उत्साहात आणखी भर पडली. सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या संदेशांचा वर्षाव झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करताना नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगसह काही मर्यादांचे पालन करावे लागले. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिला. विविध शासकीय आणि खासगी कार्यालये, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, शाळा, महाविद्यालयांमध्ये मर्यादित लोकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. मर्यादा असल्या तरी नागरिकांनी आपल्या पद्धतीने उत्साहीपणे स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यात घरे, कार्यालये रांगोळी, लहान झेंडे, फुग्यांनी सजविण्यात आली होती.

सार्वजनिकरीत्या जिलेबी, मिठाईचे वाटप करता आले नाही. त्यामुळे शहरात दरवर्षीपेक्षा जिलेबी विक्रीचे स्टॉल कमी होते. ज्या ठिकाणी स्टॉल होते, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकांनी जिलेबी, मिठाई खरेदी केली. कोरोनामुळे भेटीगाठी टाळून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी रात्रीपासून सोशल मीडियावर संदेशांची गर्दी झाली.

विविध वस्तूंची खरेदी

स्वातंत्र्यदिनानिमित्त बाजार‌पेठेत टी. व्ही., स्मार्टफोन आणि त्यांच्या ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, फ्रिज, शिलाई मशीन, आदी विविध वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक योजना होत्या. त्यांची खरेदी काही नागरिकांनी केली.

विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवली

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांमधील वर्ग अद्याप भरत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी येत नाहीत. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या विद्यार्थ्यांची शाळा आणि महाविद्यालयांमधील अनुपस्थिती जाणवली.
 

Web Title: Independence Day celebrations by Kolhapurites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.