साखरेची किंमत ४२०० रुपये क्विंटल करा, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:51 IST2024-12-04T17:50:31+5:302024-12-04T17:51:53+5:30
कोल्हापूर : साखरेची किमान आधारभूत किंमत ४२०० रुपये प्रतिक्विंटल करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी संसदेत केली. ...

साखरेची किंमत ४२०० रुपये क्विंटल करा, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
कोल्हापूर : साखरेची किमान आधारभूत किंमत ४२०० रुपये प्रतिक्विंटल करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी संसदेत केली. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. एकीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची एफआरपी वाढवली जाते. तर दुसरीकडे साखरेचा उत्पादन खर्च, कर्मचारी पगार, कर्जाचे व्याज यामुळे साखर कारखान्यांवरील आर्थिक बोजा वाढत आहे. यावर उपाय म्हणून साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाडिक म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी एफआरपीची रक्कम दरवर्षी वाढवली जाते; पण साखरेची किमान आधारभूत किंमत वाढत नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत देशातील साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो. देशातील १० कोटींपेक्षा अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी साखर उद्योग उदरनिर्वाहाचे साधन आहे. संपूर्ण देशात सुमारे ५५० साखर कारखाने असून, या उद्योगातून सुमारे साडेपाच लाख लोकांना रोजगार मिळतो.
भारतात दरवर्षी ३६० ते ४०० लाख टन साखरेचे उत्पादन होते. २०२२-२३ या वर्षात सुमारे ६० लाख टन साखर निर्यात केली. तर देशांतर्गत साखरेचा वापर सुमारे २६० लाख टन आहे. ऊस पिकाचे एकूण मूल्य ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे; पण हा संपूर्ण उद्योग हवामान बदलावर अवलंबून असतो. त्यातून साखर उद्योगाचे अनेकदा नुकसानही झाले आहे. अशा परिस्थितीत साखरेची किमान आधारभूत किंमत ४२०० रुपये प्रतिक्विंटल केल्यास कारखाने आर्थिक अडचणीत येणार नाहीत आणि त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल असे त्यांनी सांगितले.