Municipal Election 2026: उमेदवारांना नऊ लाख रुपये खर्चाची मर्यादा, १० हजारापर्यंतचा खर्च रोखीने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:42 IST2025-12-20T16:41:27+5:302025-12-20T16:42:13+5:30
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक

संग्रहित छाया
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र निश्चित करण्यापूर्वी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींशी शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच खर्चाची दरसूची ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराकरिता खर्चाची आर्थिक मर्यादा ९ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणे बंधनकारक असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक खर्चाचा तपशील नियमितपणे सादर करावयाचा आहे. किमान १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च रोख रकमेने करता येणार असून, त्यापेक्षा अधिक खर्चासाठी धनादेश किंवा ऑनलाइन प्रणालीचा वापर करणे आवश्यक राहणार आहे.
त्याच बरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरून येथून पुढची प्रक्रिया होणार असून, त्यांच्या कार्यालयामार्फत सभा, रॅली व इतर परवानग्या दिल्या जाणार आहेत. उमेदवारांना अर्जासोबत दयावयाच्या कागदपत्रांची सूची दिली जाणार आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या सूचनेप्रमाणे खर्चाची दरसूची ठेवण्याबाबत सर्वांशी चर्चा विनिमय करून सर्वानुमते दर ठरविण्यात आला. पक्षाकडून उमेदवारांवर होणारा खर्च विभागून निश्चित करण्यात येणार असून, प्रत्येक उमेदवाराने स्वतःचा खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक राहणार आहे. पक्षाचा व उमेदवाराचा एकत्रित खर्च ९ लाख रुपयांच्या मर्यादेत ठेवण्यात येणार आहे. पक्षाकडून करण्यात येणारा खर्च हा त्या-त्या पक्षांच्या सर्व उमेदवारांवर विभागून टाकला जाणार आहे. यापुढे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व कामकाज नियंत्रण अधिकारी यांच्या स्तरावर सुरू राहणार असून, निवडणुकीचे सर्व अर्ज व फॉर्म ऑफलाइन पद्धतीने नियंत्रण अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष मारुती कसबे, राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गणेश जाधव, शेकापचे बाबूराव कदम, हिंदू महासभाचे राजेंद्र तोरस्कर, वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे, राजू माने, रुपेश घट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलगुडे, राष्ट्रवादीचे सुनील देसाई, भाजपचे अध्यक्ष संतोष लाड, काँग्रेसचे रोहित पाटील आदी उपस्थित होते.