Kolhapur Municipal Corporation Election: एरव्ही न दिसलेला ‘हक्काचा माणूस’ झळकला फलकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:11 IST2025-10-25T17:09:55+5:302025-10-25T17:11:53+5:30
इच्छुक लागले कामाला : मतदारांच्या गाठीभेटी

Kolhapur Municipal Corporation Election: एरव्ही न दिसलेला ‘हक्काचा माणूस’ झळकला फलकावर
कोल्हापूर : मदतीला धावून येणारा, संकटकाळी मदत करणारा, अभ्यासू कार्यकर्ता, आपला माणूस, उगवते नेतृत्व, कामाचा माणूस, हक्काचा माणूस अशी नानाविध बिरुदावली लावलेले असंख्य कार्यकर्ते कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक आता दोन-अडीच महिन्यांनी होणार आहे, त्यानिमित्ताने गेल्या चार वर्षात कुठेही न दिसणारे हेच कार्यकर्ते आता मतदारांच्या गर्दीत पाहायला मिळत आहेत.
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु विविध कारणांनी महापालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या. निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांनी २०१९ पासून तयारी केली, परंतु निवडणूक काही जाहीर होत नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांचे प्रयत्न थांबविले. २०२१ पर्यंत वाट पाहिली त्यानंतर त्यांनी निवडणुकीचा नाद सोडून दिला. त्यांच्याकडून ना सामाजिक कार्य, ना जनतेला मदत झाली.
गेल्या चार वर्षांपासून प्रभागात पाणी आले नाही, कचरा उठाव झाला नाही, पालिकेकडे तक्रारी केल्या तरी प्रश्न सुटत नव्हते तेव्हा सांगायचे तरी कोणाला, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. काही ठरावीक माजी नगरसेवक, मोजके कार्यकर्ते सोडले तर कोणीही महापालिका कार्यालयाकडे फिरकले नाही की नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही. परंतु आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच गायब झालेले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पाण्याचा, कचऱ्याचा प्रश्न दिसायला लागले आहेत. त्यांनी प्रभागातून फेऱ्या वाढविल्या आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांनी नवरात्रीत ठिकठिकाणी झालेल्या देवींच्या आरतींना हजेरी लावली. आता तर ते प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. चौकाचौकात डिजिटल फलक लावून ‘मदतीला धावून येणारा, संकटकाळी मदत करणारा, अभ्यासू कार्यकर्ता, आपला माणूस, उगवते नेतृत्व, कार्यशील नेतृत्व, हक्काचा माणूस’ अशी नानाविध बिरुदावली लावून मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. ‘हक्काचा माणूस, आपला माणूस’ अशी टॅगलाईन काही फलकांवर दिसत आहे.
दहा वर्षानंतरच उगवले..
‘बदल हवा तर नवा चेहरा हवा’अशीही टॅगलाईन फलकांवर पाहायला मिळत आहे. काही जण वाढदिवसाचे सोहळे साजरे करत आहेत. अनेक कार्यकर्ते असे आहेत की २०१५ मध्ये निवडणुकीत दिसले होते, त्यानंतर जे गायब झाले ते आताच उगवले आहेत. त्यामुळे दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीची उजळणी आता होऊ लागली आहे.