Kolhapur- विद्यापीठात विद्यार्थ्यांचीच वानवा: 'कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी', १४ अधिविभागांत विद्यार्थीसंख्या घटली

By पोपट केशव पवार | Updated: January 2, 2025 12:20 IST2025-01-02T12:19:36+5:302025-01-02T12:20:29+5:30

प्रवेशासाठी रांगा हे चित्र झाले इतिहासजमा

In as many as 14 sub departments of Shivaji University the admission capacity of students decreased | Kolhapur- विद्यापीठात विद्यार्थ्यांचीच वानवा: 'कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी', १४ अधिविभागांत विद्यार्थीसंख्या घटली

Kolhapur- विद्यापीठात विद्यार्थ्यांचीच वानवा: 'कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी', १४ अधिविभागांत विद्यार्थीसंख्या घटली

पोपट पवार

कोल्हापूर : एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून कौशल्याधारित शिक्षणाद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचे सरकारचे धोरण असले तरी शिवाजी विद्यापीठातील तब्बल १४ अधिविभागांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता कमालीची घटली असल्याचा अहवाल प्रवेश आढावा समितीनेच दिला आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात १४ अधिविभागांत प्रवेश क्षमतेइतकेही विद्यार्थी मिळाले नाहीत. पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे वाढलेला कल, वर्षानुवर्षे प्राध्यापकांची रिक्त पदे यामुळे विद्यार्थीसंख्या घटत असल्याचा निष्कर्ष शिक्षणतज्ज्ञांकडून काढला जात आहे. कधी काळी विद्यापीठाच्या अधिविभागांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी रांगा लागायच्या, त्याच विद्यापीठात आता कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शिवाजी विद्यापीठात ३७ अधिविभाग आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक यासह विविध अधिविभागांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या घटली आहे.

का घटली विद्यार्थीसंख्या

विद्यापीठात २०२३-२४ या वर्षात क्षमतेपेक्षा कमी प्रवेश होण्याची कारणे समितीने दिली आहेत. त्यानुसार स्वायत्त महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढली, अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. विनानुदानित अभ्यासक्रमांच्या बाबतीत काही अभ्यासक्रम शासकीय शिष्यवृत्तीच्या यादीत नसल्याने अडचणी निर्माण येतात. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवरील काही टप्पे प्रवेशाला अडथळा ठरतात, काही अभ्यासक्रमांची प्रसिद्धी राष्ट्रीयस्तरावर होत नाही, अशी कारणे प्रवेश आढावा समितीने दिली आहेत.

दृष्टीक्षेपात २०२३-२४ मधील विद्यार्थीसंख्या

अधिविभाग - प्रवेशक्षमता - प्रवेशित विद्यार्थी

जर्नालिझम
विभाग बी. जे - ४० - १३
जर्नालिझम विभाग एम. जे - ३० - १२
एम. ए. मास कॉम - ३० - १६

अर्थशास्त्र
विभाग   -  प्रवेशक्षमता  - प्रवेशित विद्यार्थी
बी. एस्सी., एम. एस्सी. इकॉनॉमिक्स  - ४०  - २१

केमिस्ट्री
अप्लायड केमिस्ट्री - ६०  - १५
फिजिकल केमिस्ट्री - २०  - १८

सोशल ऑफ नॅनो सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी
बी. एस्सी., एम. एस्सी. नॅनोसायन्स -  ६०  -  ४२
एम. एस्सी. नॅनोसायन्स -  ३५  - १४

संगीत व नाट्यशास्त्र
मास्टर ऑफ आर्टस- ड्रामॅटिक - १५ - ०७
मास्टर ऑफ आर्टस- तबला - १५ - ०६

झूलॉजी
मास्टर ऑफ सायन्स -  ६०  -  ५५

बॉटनी
मास्टर ऑफ सायन्स - ५० - ४८

इलेक्ट्रॉनिक्स
मास्टर ऑफ सायन्स  - ३६   -  ३०

बायोकेमिस्ट्री
मेडिकल इन्फाॅर्मेशन मॅनेजमेंट - २० -  १३

पर्यावरणशास्त्र
मास्टर ऑफ सायन्स  - ५० - ३७

मॅथेमॅटिक्स
एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स कम्पुटर सायन्स - ३०  - ०७

हिंदी
मास्टर ऑफ आर्टस   - १५  - ११

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हल्पमेंट

विभाग  - प्रवेशक्षमता  -  प्रवेशित विद्यार्थी
एमबीए रुरल मॅनेजमेंट - ६० - ५५
मास्टर ऑफ रुरल स्टडिज -  ६०  - २८
मास्टर ऑफ सोशल वर्क - ६० - ४९
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी -  १८  - १५

Web Title: In as many as 14 sub departments of Shivaji University the admission capacity of students decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.