‘गोकुळ’ दूध संघावर प्राप्तिकर विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 05:08 IST2019-03-06T05:08:54+5:302019-03-06T05:08:59+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) मंगळवारी सायंकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले.

‘गोकुळ’ दूध संघावर प्राप्तिकर विभागाचे छापे
कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) मंगळवारी सायंकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. एक वरिष्ठ महिला अधिकारी आणि इतर चार अधिकारी यांच्या पथकाने कागदपत्रांची तपासणी केली. या छाप्याचे वृत्त रात्री नऊनंतर सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकारी आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
या कारवाईबाबत संघाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी अध्यक्ष रवींद्र आपटे, व्यवस्थापकीय संंचालक डी. व्ही. घाणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. प्राप्तिकर विभागाने गोकुळ दूध संघाने मागील तीन महिन्यांत किती लाख दूधाचे संकलन केले. किती लाख लिटर दूधाची विक्री केली आणि त्याची एकूण उलाढाल किती
झाली, यासंबंधीची कागदपत्रे तपासली.
सायंकाळी साडेपाच वाजता गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयात आलेले हे पथक रात्री नऊ वाजेपर्यंत ही तपासणी करत होते. त्याबाबत संघाकडून गोपनीयता पाळण्यात आली.
पाच कोटी भरण्याची नोटीस?
दूध संकलन आणि विक्रीच्या व्यवहारांची तपासणी केल्यानंतर या पथकाने गोकुळ दूध संघाला सुमारे पाच कोटी रुपयांचा प्राप्तिकर भरण्याची नोटीस लागू केली असल्याचे समजले. परंतु, त्यास दुजोरा मिळू शकला नाही.