राष्ट्रीय संगणक साक्षरतेच्या बोधचिन्हावर ‘निर्मिती’चा ठसा
By Admin | Updated: December 6, 2014 00:31 IST2014-12-05T23:53:23+5:302014-12-06T00:31:00+5:30
कोल्हापूरचा गौरव : अनंत खासबारदार यांचे बोधचिन्ह देशात अव्वल

राष्ट्रीय संगणक साक्षरतेच्या बोधचिन्हावर ‘निर्मिती’चा ठसा
कोल्हापूर : राष्ट्रीय संगणक साक्षरता अभियानासाठी (डिजिटल लिटरसी मिशन) कोल्हापुरातील ‘निर्मिती ग्राफिक्स’ या जाहिरात संस्थेचे संस्थापक अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या २६०० स्पर्धकांमधून त्यांचे बोधचिन्ह अव्वल ठरले आहे. यापूर्वी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी त्यांनी बनविलेल्या बोधचिन्हाला पहिला क्रमांक मिळाला आहे.
देशातील ४५ ते ५० वर्षे वयोगटांतील नागरिकांना संगणक साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हे मिशन राबविण्यात येणार आहे. या मिशनच्या बोधचिन्हासाठी देशभरातून प्रवेशिका मागविल्या होत्या. त्यात २६०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून खासबारदार यांनी बनविलेल्या बोधचिन्हाची निवड झाली आहे. त्यासाठी त्यांना २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. त्यांना सहकारी शिरीष खांडेकर यांची मदत झाली आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’पाठोपाठ आता साक्षरता मिशनसाठी देखील खासबारदार यांच्या बोधचिन्हाची निवड झाल्याने कोल्हापूरचा पुन्हा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. खासबारदार यांनी आजपर्यंत अनेक कल्पक जाहिराती, बोधचिन्हांची निर्मिती करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
बोधचिन्ह बनविताना खासबारदार यांनी रंगसंगती, आकार व सुलभता यावर लक्ष केंद्रीत केले. हे बोधचिन्ह वयाची चाळीशी ओलांडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने त्यांची संगणकाबाबतची भीती दूर व्हावी. शिवाय ते नेहमीच्या सरकारी छापाचे वाटू नये अशी दक्षता घेतली. उघडलेला लॅपटॉप आणि तो सहजपणे हाताळणारा मानवी आकृतीचा आभास अशी सुलभ रचना त्यांनी केली आहे.
स्वच्छ भारत अभियानानंतर संगणक साक्षरता मिशनच्या बोधचिन्हांद्वारे पुन्हा आमच्या विचारांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या बोधचिन्हातून सोप्या पद्धतीने विचार मांडले आहेत. आमच्या प्रयत्नांना मोठ्या स्वरूपात दाद मिळाल्याचा वेगळा आनंद होत आहे.
- अनंत खासबारदार