औद्योगिक क्षेत्रात प्रतिबंधात्मक योजनांची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:29+5:302021-04-05T04:20:29+5:30
कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रात कामाच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार टाळणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी उद्योजक, कामगार यांनी नेहमी मास्क ...

औद्योगिक क्षेत्रात प्रतिबंधात्मक योजनांची अंमलबजावणी
कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रात कामाच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार टाळणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी उद्योजक, कामगार यांनी नेहमी मास्क वापरणे, तसेच ‘मास्क नाही-प्रवेश नाही’ याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत उद्योजक, जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. यामध्ये पालकमंत्री पाटील, जिल्हाधिकारी देसाई यांनी केलेल्या आवाहनानुसार औद्योगिक क्षेत्रात कामाच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार टाळणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना उद्योजकांनी कराव्यात, असे आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी कोल्हापूूर इंजिनिअरिंग असोसिएशनने सुरू केली.
याचाच एक भाग म्हणून उद्योगांच्या प्रवेशाच्या ठिकाणी मास्क नाही-प्रवेश नाही, कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा, माझा उद्योग, माझं कुटुंब, कोरोना विरुद्ध लढाई अवघड, पण उपाय सोपे, असा संदेश असलेली पोस्टर, स्टिकर उद्योगांच्या प्रवेशच्या ठिकाणी लावण्यात आली. त्याचा प्रारंभ असोसिएशनच्या संचालक मंडळाने केला.
कोविड-१९ पासून उद्योजक व कामगारांचे रक्षण व्हावे यासाठी ४५ वर्षांवरील सर्वांनी शासनाच्यावतीने देण्यात येणारी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. औद्योगिक वसाहतीत तसेच ईएसआय हाॅस्पिटलमध्येही लस टोचण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणीही असोसिएशने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या पोस्टर अनावरणप्रसंगी सचिन मेनन, हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, रणजित शाह, श्रीकांत दुधाणे, बाबासो कोंडेकर, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, संजय अंगडी, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.