अभेद्य भिंतीचा अखेर मैदानातच अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:10+5:302021-04-04T04:26:10+5:30
लाॅकडाऊनमुळे शासनाने फुटबाॅल सामन्यांवर बंदी आणली आहे. त्यामुळे खेळाचा आनंद घ्यायचा म्हणून अनेक फुटबाॅलप्रेमी एकत्रित येऊन मैत्रीपूर्ण सामन्यांचे कृत्रिम ...

अभेद्य भिंतीचा अखेर मैदानातच अंत
लाॅकडाऊनमुळे शासनाने फुटबाॅल सामन्यांवर बंदी आणली आहे. त्यामुळे खेळाचा आनंद घ्यायचा म्हणून अनेक फुटबाॅलप्रेमी एकत्रित येऊन मैत्रीपूर्ण सामन्यांचे कृत्रिम ॲस्ट्रोटर्फ मैदानावर आयोजन करतात. त्याचप्रमाणे काही फुटबाॅलप्रेमींनी बेलबागेतील एका कृत्रिम ॲस्टोटर्फ मैदानावर अशा खेळाचे आयोजन केले होते. त्यात युवा वर्गासह ज्येष्ठांचेही मैत्रीपूर्ण सामने आयोजित केले होते. त्यात एका संघामध्ये शब्बीर हेही गोलरक्षक म्हणून खेळत होते. सामना बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यात नायकवडी यांनीही एक पेनल्टी मारली. हा फटका गोलपोस्टच्या आत लागून बाहेर आला. त्यामुळे गोल झाला की नाही हे स्पष्ट झाले नाही. पण चित्रीकरणात गोल झाल्याचे दिसले. त्यानंतर नायकवडी यांचा आनंद गगनात मावेना. यानिमित्तच्या जल्लाेषादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन जागीच ते कोसळले. तेथे उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अभेद्य भिंत
शब्बीर यांनी १९८० साली शाहू दयानंद हायस्कूलकडून राष्ट्रीय शालेय फुटबाॅल स्पर्धेत गोलरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. ही कामगिरी लक्षणीय ठरल्यामुळे त्यांची पाटाकडील तालीम मंडळाकडून दुसरा गोलरक्षक म्हणून वर्णी लागली. या संधीचे सोने करीत शब्बीर यांनी तब्बल १९९५ पर्यंत संघात उत्कृष्ट गोलरक्षक व पेनल्टी स्ट्रोक स्पेशालिस्ट म्हणून अभेद्य किल्ला लढविला. गोलपोस्टच्या एका बाजूला उभे राहून चेंडूच्या दिशेने हवेत झेपावून चेंडू अडविणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या या आठवणींना शनिवारी पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि कोल्हापूरच्या फुटबाॅलवर त्यांच्या निधनाने शोककळा पसरली.
फोटो : ०३०४२०२१-कोल-शब्बीर नायकवडी (निधन)
फोटो : ०३०४२०२१-कोल-शब्बीर ०२
ओळी : कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवरील एक स्पर्धा जिंकल्यानंतर विजयी संघातील सहकाऱ्यांसमवेत गोलरक्षक शब्बीर नायकवडी. (वर्तुळाकार खूण केलेले)