‘आयजीएम’च्या गटांगळ्या

By Admin | Updated: November 7, 2014 23:31 IST2014-11-07T23:25:09+5:302014-11-07T23:31:07+5:30

निकोप-नियोजनाची गरज : गोरगरिबांच्या दवाखान्याचीच प्रकृती खालावतेय

IGM Group | ‘आयजीएम’च्या गटांगळ्या

‘आयजीएम’च्या गटांगळ्या

राजाराम पाटील - इचलकरंजी -‘असून खोळंबा आणि नसून घोटाळा’ अशीच काहीशी परिस्थिती येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल (आयजीएम) हॉस्पिटलची आहे. सातत्याने नुकसानीत असलेल्या ‘आयजीएम’ची दिवसेंदिवस परिस्थिती खालावत आहे. वास्तविक पाहता गोरगरिबांचा असलेला हा दवाखाना ऊर्जितावस्थेला येण्यासाठी निकोपपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न होण्याऐवजी दवाखान्याचे (पर्यायाने गोरगरिबांचे) आरोग्य राजकीय भोवऱ्यात गटांगळ्या खात आहे.
संस्थानकाळापासून असलेल्या इचलकरंजीच्या दवाखान्याला राज्य दवाखान्याचा दर्जा होता. सध्याच्या न्यायालयाच्या इमारतीसमोर केईएम हॉस्पिटल या नावाने हा दवाखाना दिमाखात सुरू होता. स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा दवाखान्याकडे प्रसूती विभाग कार्यरत होता. स्वातंत्र्यानंतर दवाखान्याचे हस्तांतर नगरपालिकेकडे झाले. केईएमकडे ७५ खाटांचे सुसज्ज इस्पितळ चालू होते. शहरवासीयांबरोबरीनेच आसपासच्या खेडेगावांतील रुग्ण येथे उपचारासाठी येत. दररोज हजारो बाह्यरुग्णांवरही औषधोपचार केले जात असत.
साधारणत: दहा वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयातील सर्व विभाग सध्याच्या आयजीएम रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. ३५० खाटांच्या इमारतीमध्ये आता १७५ खाटांचे रुग्णालय सुरू झाले. आंतररुग्ण विभागात पुरुष व स्त्रियांचे स्वतंत्र कक्ष असून, प्रसूती व बालरुग्ण असेही स्वतंत्र कक्ष आहेत. याशिवाय शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण तपासणी विभाग, भांडार, एडस् रुग्णांसाठी समुपदेशन उपचार असेही कक्ष सुरू आहेत. नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना केईएम रुग्णालय आणि आयजीएम रुग्णालयामध्येसुद्धा अनेक गंभीर रोगांवर उपचार व शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
त्यावेळी बरेचसे लोकप्रतिनिधी आपापल्या नातलगांवर किंवा जवळच्या कार्यकर्त्याच्या रुग्णावर आयजीएममध्ये उपचार करून घेण्यासाठी आग्रह धरीत. नगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावली आणि त्याबरोबरच रुग्णालयही आर्थिकदृष्ट्या रोडावले.
प्रतीवर्षी सुमारे तीन कोटी रुपयांचा तोटा असलेल्या ‘आयजीएम’कडे काही परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, प्रसूतीगृहाकडील स्त्री रोगतज्ज्ञ कंत्राटी पद्धतीच्या आहेत. अशा गांजलेल्या स्थितीतील रुग्णालयाकडे येणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना प्रथमोपचार करून पुढे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाकडे किंवा सांगली येथील सिव्हील रुग्णालयाकडे पाठविले जाते. चांगल्या व गंभीर रुग्णांसाठी ‘आयजीएम’ फक्त टपल्याचे (पोस्टमनचे) काम करतेय. (क्रमश:)

काविळीच्या वेळीच फक्त ऐरणीवर
२०१२ मध्ये आलेल्या कावीळ साथीमध्ये ‘आयजीएम’ च्या अवस्थेची समस्या ऐरणीवर आली. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत ‘आयजीएम’ सुसज्ज करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले. साथ संपताच नेहमीप्रमाणे आयजीएमचे प्रकरण बाजूला पडले.



स्वबळावर की
शासनाकडे वर्ग
पालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेसला विविध शासकीय निधीमधून आयजीएम रुग्णालय सुदृढ-सक्षम बनवायचा आहे, तर दवाखाना शासनाने चालवावा, अशी भूमिका शहर विकास आघाडीची आहे. दरम्यान, केंद्र सरकारमधून निधी आणून सर्व ३५० खाटांचा दवाखाना चालविण्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली आहे.



अत्यवस्थ रुग्णांसाठी
‘डंपिंग ग्राऊंड’
शहरातील काही बड्या रुग्णालयांकडून त्यांच्याकडे अत्यवस्थ झालेले किंवा अंतिम घटका मोजणारे रुग्ण आयजीएमला पाठविले जातात. त्यामुळे ‘त्या’ रुग्णांची शेवटची सर्व उस्तवारी आणि मृत झाल्यानंतरचीही उपद्व्याप आयजीएमला करावा लागतो. म्हणजे शेवटची घटका मोजणाऱ्या रुग्णांसाठी आयजीएम ‘डंपिंग ग्राऊंड’ बनले आहे, अशी चर्चा आहे.

Web Title: IGM Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.