Mahadevi Elephant: गप्प राहिलो तर रिंगणातील घोडाही नेतील - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:30 IST2025-08-04T19:28:14+5:302025-08-04T19:30:17+5:30
राष्ट्रपती यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : अंबानी अमाप पैशांनी नेते, कोर्ट मॅनेज करू शकतात. प्रशासनाला लाचार बनवू शकतात. मात्र, जनेतला मॅनेज करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर येऊन नांदणी मठाची महादेवी हत्तीण परत करा, अशी मागणी केली. ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावी. अन्यथा येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी रविवारी दिला.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून महादेवी हत्तीण परत करावी, यासाठी राष्ट्रपती यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पुढील लढ्याची दिशा स्पष्ट करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा आल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, तथाकथित पेटाच्या तक्रारीवरून १९९३ पासून नांदणी मठात असलेली महादेवी वनतारामध्ये नेण्यात आले. यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेण्यात आला. मुळात वनतारावर वन्य प्राण्याची तस्करी केली जात असल्याचे आरोप आहेत. आमच्या हत्तिणीला घेऊन जाताना तिचा छळ केला. याकडे पेटा संघटना का लक्ष देत नाही, अशा ठिकाणी महादेवीला घेऊन गेल्याने मठाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
नांदणी मठाचा परिसर हरितगृहाचा पट्टा असल्याने हत्तीसाठी पोषक आहे. याउलट गुजरातमधील वनतारा येथील तापमान ४७ अंश डिग्रीपर्यंत असते. हत्तीसाठी हा परिसर पोषक नाही. अशा ठिकाणी महादेवी कशी सुरक्षित राहू शकेल. पंचगंगा नदीत पोहणाऱ्या महादेवीला वनताऱ्याच्या डबक्यात सोडले आहे. म्हणून महादेवी एका मुक्या प्राण्यासाठी पदयात्रेत लोक महापुराप्रमाणे सहभागी झाले आहेत. म्हणून राज्य, केंद्र शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून महादेवी हत्तीण नांदणी मठास मिळवून द्यावी.
गप्प राहिलो तर रिंगणातील घोडाही नेतील..
शेट्टी म्हणाले, आषाढीच्या वारीत रिंगण करून त्यामध्ये घोडा पळवला जातो. आम्ही आता गप्प राहिलो तर हा घोडा आणि महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व हत्तीही वनतारा घेऊन जाईल. तथाकथित पेटा म्हैशीला त्रास होतो म्हणून त्याचे दूध काढू नका, असेही म्हणतील. म्हणून यापुढील काळात लढा तीव्र केला जाईल.
मठाधीशांचाही आत्मक्लेश यात्रेत सहभाग
भगवान महावीर जयंती उत्सव समिती, कोल्हापूर येथील समस्त जैन आणि मुस्लीम बांधवांसह सर्व पक्षीय नागरिक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर या मूक आत्मक्लेश यात्रेत सहभागी झाले. नांदणी मठाचे पदाधिकारी, शुक्रवार पेठ येथील जैन मठाचे भट्टारक स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महाराज, हुबळी येथील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महाराज, श्रवण बेळगोळ येथील स्वस्तिश्री चारूकिर्ती महाराज सहभागी झाले.
भाषणातून शेट्टी यांनी केलेल्या मागण्या अशा..
- प्राण्याची वाहतूक रात्री करता येत नाही. तरीही कायदा, नियम तोडून, मोडून महादेवी हत्तिणीची रात्री आणि दिवस सलग ४८ तास वाहतूक केल्याबद्दल वनतारा आणि अंबानीवर गुन्हा दाखल करा.
- वनताऱ्याला केंद्र सरकारच्या आवश्यक परवानग्या नाहीत. वनताराच बोगस आहे. त्याची चौकशी करावी.
- महादेवी हत्तिणीसंबंधी खोटा अहवाल दिलेल्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
आत्मक्लेश यात्रेत दोन राज्यांतील नागरिक
आत्मक्लेश यात्रेला रविवारी पहाटे नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली-कोल्हापूर महामार्गाने खडी क्रशर, निमशिरगाव फाटा, तमदलगे, मजले फाटा, हातकणंगले येथून चोकाकला आले. तेथे विश्रांती घेत शिरोली फाटा येथे पोहोचली. सायंकाळी ४ वाजता पुणे-बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल येथून ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचली. यात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र, तसेच कर्नाटक राज्यातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. यात्रेतील सहभागी नागरिकांनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’, असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.