मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे
By विश्वास पाटील | Updated: July 22, 2022 18:54 IST2022-07-22T18:52:39+5:302022-07-22T18:54:01+5:30
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही नाव चर्चेत

मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक व धैर्यशिल माने हे दोघे बंडखोर शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे कोल्हापूरमधील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. शिवसैनिकांनी बंडखोरांना पुन्हा निवडणून येताच कसे हे बघू असे आव्हान देखील दिले. लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी जिल्ह्यात मात्र आतापासूनच जोडण्या लावण्यास सुरुवात झाली आहे. काल, गुरुवारीच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर आज, शुक्रवारी शिवसेनेचे कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील यांनी ताकद लावल्यास महाविकास आघाडीला कोल्हापूर लोकसभेची जागा पुन्हा जिंकणे अवघड नाही असे मत संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केले. आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेतील बंडाळीनंतर घाटगे यांनी कोणतीच उघड भूमिका घेतलेली नाही. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही माध्यमातून त्यांचे नाव येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. घाटगे म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकीसाठी अजून दोन वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे त्याबद्दल आताच कांही बोलणे किंवा आडाखे बांधणे हे अतिघाईचे ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.