पालकमंत्र्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत वेळ न दिल्यास सामुदायिक उद्घाटन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:32+5:302021-02-05T07:07:32+5:30
ब्रेक टेस्ट ट्रॅक लोकार्पण प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रिअल इस्टेट ...

पालकमंत्र्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत वेळ न दिल्यास सामुदायिक उद्घाटन करणार
ब्रेक टेस्ट ट्रॅक लोकार्पण प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रिअल इस्टेट ॲण्ड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक सुरू करण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. राज्याचे परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून तारीख मिळत नाही. त्यामुळे १० फेब्रुवारीपर्यंत या ट्रॅकचे लोकार्पण न झाल्यास ११ फेब्रुवारीला सामुदायिकपणे जमून ट्रॅकचे उद्घाटन करू, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी दिला. तसेच आरटीओ कार्यालयासाठी नगरपालिकेने जागा दिल्यास सहा महिन्यांत आरटीओ कार्यालय आणू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात आरटीओ कार्यालय व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. नगरपालिकेने शहरातील गारमेंट प्रशिक्षण केंद्राची इमारत व खुली जागा शासकीय नियमांनुसार भाडेतत्त्वावर द्यावी. जागा मिळाल्यापासून सहा महिन्यांत आरटीओ कार्यालय मंजूर करून आणण्याची जबाबदारी घेतो, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी रोहित काटकर, रमेश सरनाईक, बालाजी वर्धन, अनुराधा जाधव, राजेंद्र यादव, आदी उपस्थित होते.