इचलकरंजीत बांधकाम कामगार तरुणाचा निर्घृण खून, आठजणांनी केले वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:24 IST2018-07-23T16:20:44+5:302018-07-23T16:24:36+5:30
इचलकरंजी येथील शांतीनगरमध्ये एका तरुणाचा सात ते आठ वार करून निर्घृण खून करण्यात आला. रामा कचरू गरड (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

इचलकरंजीत बांधकाम कामगार तरुणाचा निर्घृण खून, आठजणांनी केले वार
इचलकरंजी : येथील शांतीनगरमध्ये एका तरुणाचा सात ते आठ वार करून निर्घृण खून करण्यात आला. रामा कचरू गरड (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
रामा याच्या तोंडावर, डोक्यावर, पोटावर, मानेवर, हातावर वार केले. गावभाग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केला आहे. रामा याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, तोंडाला रुमाल बांधलेल्या सहा ते आठजणांनी मोटारसायकलवरून रामा याला शांतीनगर परिसरात गाठून वेगवेगळ्या हत्यारांनी खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
रामा हा बांधकाम कामगार असून, त्याच्या खुनाचे नेमके कारण व मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, इरगोंडा पाटील यांनी भेट दिली.