इचलकरंजीतील पॉवरलूम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: July 10, 2017 17:49 IST2017-07-10T17:49:43+5:302017-07-10T17:49:43+5:30
जीएसटीतील क्लिष्ट नियम शिथील करा, तिसऱ्या दिवशीही व्यापार बंदच

इचलकरंजीतील पॉवरलूम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
आॅनलाईन लोकमत
इचलकरंजी , दि.१0 : जीएसटी कर प्रणालीतील क्लिष्ट तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर पॉवरलूम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘क्लिष्ट तरतुदी रद्द करा अथवा जीएसटी हटवा’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. येथील गांधी पुतळ्यापासून मोर्चास सुरूवात झाली.
मुख्य मार्गांवरून प्रांत कार्यालयावर मोर्चा आला. तेथे शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये कापड येत असल्याने यापूर्वी कापडावर कर लावण्यात आला नव्हता. आता जीएसटीमुळे कर लागल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांवर कपडे खरेदी करताना परिणाम होणार आहे. तसेच जीएसटी कर प्रणालीतील क्लिष्ट आणि जाचक अटींचा केलेला समावेश रद्द करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये येथील सायझिंग, प्रोसेसिंग, ट्रान्स्पोर्ट, अडते, क्लॉथ ब्रोकर्स असोसिएशन या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच उगमचंद गांधी, रामपाल भंडारी, अशोककुमार बाहेती, चंदनमल मंत्री, रामविलास मुंदडा, भीमकरण छापरवाल, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, लक्ष्मीकांत मर्दा, मिश्रीलाल जाजू, राजाराम चांडक, विनोद कांकाणी, राजाराम भुतडा, आदींसह शहरातील व्यापारी सहभागी झाले होते.
तिसऱ्या दिवशीही व्यापारी बंदला प्रतिसाद
येथील कापड व्यापारी असोसिएशनने पाच दिवस व्यापारी पेढ्या बंदची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे शनिवार (दि.८) पासून शहरातील सर्व व्यापारी पेढ्या बंद राहिल्या आहेत. सोमवारी तिसऱ्या दिवशीही बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला. परिणामी करोडो रुपयांचे होणारे कापड खरेदी-विक्रीचे सौदे पूर्णपणे बंद पडले आहेत. त्याचा परिणाम सुताच्या व्यापाऱ्यांवरही झाला आहे.