इचलकरंजीचा पाणीपुरवठा तोडणार ?

By Admin | Updated: April 23, 2015 00:59 IST2015-04-21T00:08:43+5:302015-04-23T00:59:25+5:30

पाणीपट्टीची थकबाकी : पाटबंधारेकडून १२.७३ कोटींची मागणी

Ichalkaranji water supply cut? | इचलकरंजीचा पाणीपुरवठा तोडणार ?

इचलकरंजीचा पाणीपुरवठा तोडणार ?

इचलकरंजी : नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना पाटबंधारे खात्याने बारा कोटी ७३ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या थकबाकीची रक्कम वसुलीची इचलकरंजी नगरपालिकेकडे मागणी केली आहे. परिणामी शहराचा नळ पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या चौदा वर्षांपासून इचलकरंजी नगरपालिकेकडे पाणीपट्टीची थकबाकी प्रलंबित राहिली आहे. ही थकबाकी औद्योगिक व घरगुती वापर या तांत्रिक मुद्द्यांमुळे वाढत चालली आहे. याबाबत यापूर्वी पाटबंधारे मंत्रालयापर्यंत संयुक्त बैठका होऊनसुद्धा त्याबाबतचा कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने शहराचा पाणीपुरवठा तोडण्याची तलवार टांगली गेली आहे.
इचलकरंजी शहरास कृष्णा व पंचगंगा अशा दोन्ही नद्यांतून पाण्याचा उपसा केला जातो. मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून घेण्यात येणाऱ्या पाण्यासाठी वार्षिक सव्वा दोन कोटी रुपये, तर शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीतून पाणी घेण्यासाठी ४० लाख रुपयांची पाणीपट्टी पाटबंधारे खात्याला देण्यात येते. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामध्ये घरगुती व औद्योगिक नळ पाण्याचे ग्राहक असल्यामुळे पाटबंधारे खात्याकडून हा तांत्रिक मुद्दा उचलून धरला जात आहे आणि अन्य नगरपालिकांपेक्षा इचलकरंजी नगरपालिकेची पाणीपट्टी जादा दराने आकारली जाते. अन्य नगरपालिकांप्रमाणे पाणीपट्टी भरली जाते. त्यात येणाऱ्या फरकाची रक्कम तेरा कोटी २७ लाख ४२ हजार इतकी झाली आहे. त्यातील ४९ लाख ८८ हजार रुपये भरण्यात आल्यामुळे अद्यापही बारा कोटी ७३ लाख ३९ हजार रुपये थकीत आहेत. ती भरण्यासाठी पाटबंधारे खात्याने वारंवार स्मरणपत्रे देऊन तगादा लावला आहे.(प्रतिनिधी)

नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट
दरम्यान, नगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे तिजोरीमध्ये खडखडाट झाला आहे. मागील आठवड्यातच पालिकेच्या विविध विभागांकडे असलेल्या मक्तेदारांकडून आग्रह धरण्यात आल्यामुळे एक कोटी रुपये मक्तेदारांना देण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून शहराचा पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Ichalkaranji water supply cut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.