इचलकरंजी आगाराची लालपरी मालवाहतुकीत ठरली सोनपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:30+5:302021-04-06T04:22:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. या मंदीतही संधी शोधत एस. ...

Ichalkaranji depot's Lalpari became Sonpari in freight | इचलकरंजी आगाराची लालपरी मालवाहतुकीत ठरली सोनपरी

इचलकरंजी आगाराची लालपरी मालवाहतुकीत ठरली सोनपरी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. या मंदीतही संधी शोधत एस. टी. महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू करून आर्थिक स्थैर्य प्राप्त केले. इचलकरंजी आगाराने सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व घटकांतील कामगिरी पाहता, कोल्हापूर विभागात इचलकरंजी आगार पाचव्या क्रमांकावर आहे. तरीही प्रति किलोमीटरमधील उत्पन्न कोल्हापूर विभागात सर्वात जास्त आहे. त्यामुळे मालवाहतूक इचलकरंजी आगारासाठी ‘सोनपरी’ ठरली आहे.

देशामध्ये २२ मार्च २०२०पासून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले. याचा परिणाम एस. टी. महामंडळाच्या अर्थचक्रावरही झाला. कोरोनाला संकट न मानता, एस. टी. महामंडळाने संधी म्हणून पाहत कोरोना काळात आपली मालवाहतूक चांगलीच विस्तारली. इचलकरंजी आगाराने गतवर्षी ६ जूनपासून मालवाहतूक सेवा सुरू केली. पहिली सेवा इचलकरंजी ते महाडपर्यंत देण्यात आली. सुरुवातीला ग्राहक मिळवण्यासाठी महामंडळाला खूप अडचणी आल्या. आगारप्रमुख व कर्मचारी यांनी शहरासह आसपासच्या गावातील होलसेल व्यापारी, उद्योजक, अडते यांना भेटून आपल्या मालवाहतूक सेवेची खात्री करून दिली. त्यानंतर सततचा पाठपुरावा, माफक दर, विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा यामुळे इचलकरंजी आगार अतिशय अल्पावधीत लोकांच्या पसंतीला उतरले.

सध्या आगाराकडे ५ ट्रकची सुविधा उपलब्ध असून, मागणीनुसार अजून यामध्ये वाढ करण्याची तयारी आगारप्रमुखांनी दर्शवली आहे. मालवाहतूक सेवा सुरू झाल्यापासून आजतागायत एस. टी. महामंडळाने जवळपास ५० हजार ९२५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे, तर २१ लाख ९२ हजार १७१ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. इचलकरंजी आगाराने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर यासह अन्य जिल्ह्यांत वाहतूक सेवा पुरवली आहे.

प्रतिक्रिया

इचलकरंजी आगार ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. मालवाहतुकीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरज भासल्यास ट्रकची संख्या वाढवून अधिक सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

- संतोष बोगरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक

Web Title: Ichalkaranji depot's Lalpari became Sonpari in freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.