Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:08 IST2024-06-22T16:07:11+5:302024-06-22T16:08:48+5:30
‘के. पी.’ना हबकी डावाची सवय

Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला
आमजाई व्हरवडे : आगामी विधानसभा मी लढणार असून, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व व स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा आशीर्वाद व शेकाप जनता दल उद्धव सेना यांची साथ माझ्यासोबत असल्याने महाविकास आघाडीची उमेदवारही मलाच मिळेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.
‘राधानगरी’ मतदारसंघातील माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. आवळी बुद्रूक (ता.राधानगरी) येथे शनिवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
ए. वाय. पाटील म्हणाले, मी ३५ वर्षे राजकारण करत असताना सामाजिक कामच्या शिदोरीवरच कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आता विधानसभा लढण्याची मी तयारी केली असून, आता कोणत्याही परस्थितीत थांबणार नाही.
यावेळी भोगावतीचे उपाध्यक्ष राजू कवडे, संचालक नंदूभाऊ पाटील, मानसिंग पाटील, दिनकर पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, आर. वाय. पाटील, अवि पाटील, मोहन पाटील, संदीप पाटील, महादेव कोथळकर, नेताजी पाटील, प्रकाश मोहिते, अमर पाटील, अशोक पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, विलास हळदे आदी उपस्थित होते.
‘के. पी.’ना हबकी डावाची सवय
महाविकास आघाडीची उमेदवारी आपणालाच मिळणार, अशा वावड्या काही मंडळी उठवत आहेत. पण त्यांना हबकी डावाची जुनी सवय असल्याचा टोला ए. वाय. पाटील यांनी ‘के. पीं’चे नाव न घेता हाणला.
इतर निवडणुकांनाही हातात ‘हात’
केवळ विधानसभा निवडणुकीसाठी नव्हे तर आगामी सर्वच निवडणूका काँग्रेस, शेकाप, उद्धवसेना, जनता दल व आम्ही हातात हात घालून लढणार असल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले.