हमालांची दहा टक्के वाढीची मागणी अडत्यांकडून मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:32 IST2019-11-15T13:31:06+5:302019-11-15T13:32:30+5:30
दरवर्षी दहा टक्के हमाली वाढीची हमालांची मागणी अडते व्यापाऱ्यांनी मान्य केल्याने संभाव्य गूळ सौदे बंद आंदोलनावर अखेर पडदा पडला. दरवाढ न दिल्यास आज, शुक्रवारपासून सौद्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हमालांनी घेतला होता.

हमालांची दहा टक्के वाढीची मागणी अडत्यांकडून मान्य
कोल्हापूर : दरवर्षी दहा टक्के हमाली वाढीची हमालांची मागणी अडते व्यापाऱ्यांनी मान्य केल्याने संभाव्य गूळ सौदे बंद आंदोलनावर अखेर पडदा पडला. दरवाढ न दिल्यास आज, शुक्रवारपासून सौद्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हमालांनी घेतला होता.
परतीचा पाऊस थांबल्यानंतर गूळ हंगामाने वेग घेण्यास सुरुवात केली असतानाच हमाली वाढीवरून हमालांनी आंदोलनास्त्र उपसले होते. हमाली वाढीवरून अडते व हमाल यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने सोमवारी दुपारपासून हमालांनी बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प केले होते. मंगळवारी सौदेच निघाले नाहीत.
गुरुवारपर्यंत निर्णय न झाल्यास आजपासून बेमुदत बंदचा निर्णयही हमाल संघटनेने जाहीर केला होता.
दरम्यान, बुधवारीच सभापती बाबासो लाड यांनी अडते व्यापारी व हमाल प्रतिनिधींना एकत्र बोलावून यातून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन्ही घटकांतील वादाची झळ शेतकऱ्यांना बसू नये म्हणून गूळ सौदे काढण्याचीही सूचना केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सौदे निघाले.
सौदे संपल्यानंतर व्यापारी व हमाल यांच्या प्रतिनिधींनी सभापतींची भेट घेऊन यावर चर्चा केली. येथेही दोन्ही बाजूंकडून शेवटपर्यंत ताणले गेले; पण अखेर हमालांच्या मागणीनुसार आणि पूर्वी ठरलेल्या करारानुसार दहा टक्के दरवाढ देत असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले. यानंतर दोन्ही बाजूकडून तयार झालेला तणाव निवळला.