माणुसकीचा झरा...

By Admin | Published: March 16, 2017 12:21 AM2017-03-16T00:21:12+5:302017-03-16T00:21:12+5:30

माणुसकीचा झरा...

Humanity bark ... | माणुसकीचा झरा...

माणुसकीचा झरा...

googlenewsNext


आजकाल एक सार्वत्रिक ओरड ऐकायला मिळते ती म्हणजे समाजातील माणुसकी कमी होत आहे. प्रामाणिकपणा कमी झाला आहे. जो तो स्वत:च्या स्वार्थाच्या मागे लागला आहे. हे काहीअंशी खरे असेलही; पण समाजात आजही माणुसकी जिवंत आहे. प्रामाणिकपणाही कायम आहे, हे दाखवून देणारे अनेक प्रसंग पाहायला, ऐकायला, वाचायला मिळत असतात. गेल्या काही दिवसांत या बाबी प्रकर्षाने जाणवून देणाऱ्या दोन घटना घडल्या. कोल्हापूरचा रंगकर्मी सागर चौगुले यांचे पुण्यात ‘अग्निदिव्य’ हे नाटक सादर करीत असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू नाट्य चळवळीलाच हादरा देणारा होता. यापेक्षा मोठा धक्का सागर यांच्या कुटुंबीयांना होता. सागरचा आधार हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयाचे झालेले नुकसान कशानेही भरून न येणारे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. हे लक्षात घेऊन रंगकर्मी आणि मित्रमंडळींनी कोल्हापुरात एक बैठक घेऊन सागर यांच्या कुटुंबाला भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निधी संकलनही सुरू केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सागरच्या मुलीच्या नावे पाच लाखांची ठेव ठेवण्याचा व पत्नीला शासकीय नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय स्थानिक आमदारांच्या फाऊंडेशननेही दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. याचबरोबर व्यक्ती, संस्थाही मदतीसाठी पुढे आल्या. ही झाली समाजातील माणुसकीचा झरा दर्शविणारी पहिली घटना.
दुसरी घटना आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याबाबतची आहे. सांगली जिल्ह्यातील एका आंतरधर्मीय प्रेमीयुगुलाने वर्षभरापूर्वी घरच्यांचा विरोध डावलून पळून जाऊन लग्न केले. यामुळे घरच्यांचा आधार तुटलेला. पती रंगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. आपल्या पत्नीला त्याने कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तिला काविळीचीही लागण झालेली. त्यामुळे तिची प्रकृती नाजूक बनली होती; मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तिची सुखरूप प्रसूती केली. कावीळही बरी केली. या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. त्याचा आनंद एका बाजूला असतानाच रुग्णालयाचे बिल कसे भागवायचे, याची चिंता त्या पतीला लागली होती. ‘पैशाअभावी डिस्चार्ज थांबला होता’, याबाबतची बातमी ‘लोकमत’ने दिली व पुन्हा एकदा माणुसकीचा झरा पाहायला, अनुभवण्यास मिळाला. आंतरधर्मीय विवाह संस्थेच्या डॉ. मेघा पानसरे, महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर, ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन बिल देण्याची लेखी हमी दिली. पतीनेही आपल्याजवळचे १५ हजार रुपये दिले. रुग्णालयाने त्या मातेला डिस्चार्ज दिला. खासदार धनंजय महाडिक, मेडिकल असोसिएशन, लिंगायत बिझनेस फोरम, माजी आमदार नानासाहेब माने, मिलिंद धोंड, शाहू साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे. आदींनी या मातेचे बिल भागविण्यासाठी हातभार लावला. केवळ एका बातमीवर माणुसकीच्या झऱ्यातून आर्थिक ओघ आला अन् या दाम्पत्याची रुग्णालयातून सुटका झाली.
कोल्हापुरातच नव्हे, तर सगळीकडेच समाजात अनेक संस्था, व्यक्ती असतात की ज्या गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जात असतात. मग ती अडचण कोणतीही असो. फक्त तिची माहिती योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचायला हवी. अलीकडे प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत आहे. त्यात आंतरजातीय , आंतरधर्मीय विवाहांची संख्याही लक्षणीय असते; मात्र आपला समाज आजही प्रेमविवाह त्यातही आंतरजातीय विवाह स्वीकारायला तयार नसतो. त्यामुळे असे विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आंतरजातीय विवाहांना समाजाची मोठ्या प्रमाणात मान्यता मिळू लागली, तर जातिभेदही संपुष्टात येऊ लागतील. - चंद्रकांत कित्तुरे

Web Title: Humanity bark ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.