श्री जोतिबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; चांगभलंच्या गजराने दुमदुमली अवघी दख्खननगरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:55 IST2025-02-23T15:54:46+5:302025-02-23T15:55:04+5:30
आज दुसऱ्या खेट्याला श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली होती.

श्री जोतिबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; चांगभलंच्या गजराने दुमदुमली अवघी दख्खननगरी
जोतिबा: श्री क्षेत्र जोतिबाचा दुसरा रविवार खेट्याला आज भाविकांची अलोट गर्दी झाली. पहाटेच्या वेळी चांगभलंच्या गजराने अवघी दख्खननगरी दुमदुमली होती. मंदिराात सेवाभावी संस्थेच्यावतिने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
आज दुसऱ्या खेट्याला श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली होती. कोल्हापूर वडणगे निगवे कुशिरे गायमुख तीर्थ मार्गे पायी चालत खेटेकरी भाविक जोतिबा मंदिरात दाखल झाले. चांगभलंचा गजर करीत भाविकांनी दर्शन घेतले. चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्था, मंडळांनी प्रसाद वाटप केला. सकाळी ९ वाजता पंचामृतअभिषेक झाला. यानंतर मुख्य पुजारी यांचे हस्ते अभिषेक झाला.
जोतिबाची अलंकारीत खडी महापूजा बांधली. सकाळी ११ वाजता उंट घोडे वाजंत्री देवसेवकांच्या लवाजमा सह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करीत धुपारतीचे दर्शन घेतले. दुसऱ्या खेटेला भाविकामुळे मंदिराबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर सांगली सातारा कराड भागातील भाविक सहभागी होते.
दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस स्टेशनचे सपोनि कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तैनात होते. दर्शन रांग व्यवस्थेसाठी गावकर, पुजारी समिती, स्वंयसेवक हजर होते.