लाडक्या बहीणींचा लाभ घेणारे भाऊ किती?, गुपीतच!; कोल्हापूर जिल्हा महिला बाल विभागाकडे नाही आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:03 IST2025-07-31T17:02:20+5:302025-07-31T17:03:58+5:30
थेट मंत्रालयातून कार्यवाही

लाडक्या बहीणींचा लाभ घेणारे भाऊ किती?, गुपीतच!; कोल्हापूर जिल्हा महिला बाल विभागाकडे नाही आकडेवारी
कोल्हापूर : वाहत्या पाण्यात हात धुऊन घेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १४ हजार पुरुषांपैकी जिल्ह्यातील पुरुष किती ही संख्या अजून जिल्हा महिला व बाल विभागाला कळालेली नाही. लाडकी बहीण योजनेचे पोर्टल राज्य शासनाच्या पातळीवर चालवले जात असून, त्याची कोणतीही आकडेवारी जिल्ह्यांना पाठवली जात नाही. त्यामुळे या योजनेच्या पुरुष लाभार्थींपासून बोगस लाभार्थी, सरकारी कर्मचारी महिला, अन्य योजनांचा लाभ घेऊनही लाडकी बहीणचा लाभ घेत असलेल्या महिला यापैकी एकाचीही आकडेवारी या विभागाकडे नाही.
राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वाहत्या गंगेत पुरुषांनीही हात धुऊन घेतल्याचे समाेर आले आहे. ‘लोकमत’कडील आकडेवारीनुसार, १४ हजार २९८ पुरुषांच्या खात्यावर ही रक्कम गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर महिला व बाल कल्याण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, मंत्री आदिती तटकरे यांनी या आकडेवारीची शहानिशा केली जाईल, असे जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील किती पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला याची आकडेवारी जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला. मात्र, जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे ही आकडेवारी उपलब्ध नाही.
जिल्ह्यांकडे आकडेवारी का नाही?
लाडकी बहीण योजनेसंबंधीची कोणतीच माहिती जिल्ह्याकडील विभागांकडे नाही. थेट मंत्रालयातून चाळण लावली जाते. तेथूनच महिला सरकारी कर्मचारी आहेत का, अन्य योजनेचा लाभ घेतात का, बोगस अर्ज भरलेत का, चारचाकी-उत्पन्न या निकषात बसतात का या सगळ्या तपासणीची कार्यवाही मंत्रालय पातळीवर केली जात आहे. तसे लाभार्थी आढळले की त्यांचे लाभ बंद केले जात आहेत. पण, जिल्हा कार्यालयाकडे स्थानिक पातळीवर कोणतीच माहिती का उपलब्ध नाही, याचे उत्तर मात्र सरकारी यंत्रणेकडे नाही.
फक्त तक्रारींची नोंद
लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला की महिला जिल्हा महिला व बाल विभागाकडे तक्रार करण्यासाठी येतात तेंव्हाच विभागाला त्यांचा लाभ बंद झाल्याचे कळते. त्यानंतर ते महिलेचा अर्ज, आधार व अन्य संबंधित कागदपत्रे तपासून त्यांचे कारण सांगतात. कार्यालयाकडे अशा तक्रारींचे चार-पाच रजिस्टर भरले आहेत.