कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:30 IST2025-11-17T12:30:12+5:302025-11-17T12:30:28+5:30
तयारी केलेल्या उमेदवारांवर अन्याय

कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी
कोल्हापूर : टीए बटालियनच्या सैन्य भरतीपूर्वी सायबर कॉलेजच्या पाठीमागील मैदानात हुल्लडबाजांनी केलेल्या चेंगराचेंगरीत दोन तरुण जखमी झाले. शुभम नामदेव पाटील (वय २३, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) आणि आदित्य दत्तात्रय तहसीलदार (२३, रा. तुरंबे, ता. राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत. हा प्रकार रविवारी (दि. १६) सकाळी सहाच्या सुमारास घडला. हुल्लडबाजीमुळे भरतीसाठी पूर्वतयारी करून आलेल्या अनेक उमेदवारांना प्रक्रियेविनाच बाहेर पडावे लागले.
टीए बटालियनच्या भरती प्रक्रियेसाठी शनिवारी रात्री कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गुजरात आणि तेलंगणा येथील उमेदवारांना बोलवले होते. सायंकाळपासूनच हजारो उमेदवारांनी सायबर कॉलेजच्या मागील मैदानात गर्दी केली होती. पहाटे पाचपासून उमेदवारांचे जिल्हानिहाय गट तयार करण्याचे काम सुरू झाले. गुजरात आणि तेलंगणाच्या उमेदवारांना भरतीसाठी प्राधान्य देऊन शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर पाठवण्यात आले.
त्यानंतर जिल्हानिहाय गट तयार करून अधिकारी भरतीबाबत सूचना देत असतानाच काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. अचानक उडालेला गोंधळ आणि चेंगराचेंगरीत दोन उमेदवार जखमी झाले. जवानांनी हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार करताच अनेक उमेदवार मैदानाच्या भिंतीवरून उड्या टाकून बाहेर पडले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
खुल्या भरतीमुळे स्थानिकांवर अन्याय?
टीए बटालियनची खुली भरती असल्याने देशभरातील उमेदवार हजेरी लावत आहेत. त्या-त्या राज्यात भरती प्रक्रिया राबविणे सोयीचे असताना खुली भरती राबवून स्थानिक उमेदवारांवर अन्याय केला जात आहे, अशा भावना काही तरुणांनी व्यक्त केल्या. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन भरती प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणीही तरुणांनी केली.
तयारीवर पाणी पडले
कागल तालुक्यातील एका अकॅडमीत गेल्या दोन वर्षांपासून तयारी करणारे २४ तरुण भरतीसाठी आले होते. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने त्यांचा एक मित्र जखमी झाला. भरती प्रक्रियेऐवजी त्यांना मित्राला उपचारासाठी घेऊन जावे लागले. दोन वर्ष केलेल्या तयारीवर हुल्लडबाजांमुळे पाणी पडले, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.