इचलकरंजी : शहरातील एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून या टोळीने व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपये उकळले आहेत.
शितल मोरे, मंगल हाजिंगे, शिवानंद हाजिंगे, बबलू हाजिंगे व रियाज मुल्ला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील शितल हिच्याशी शहरातील एका व्यापाऱ्याची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्यातून जवळीक निर्माण करत शितलने प्रेमाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची आर्थिक लुबाडणूक सुरू केली. हा प्रकार जून २०१९ ते २७ जून २०२२ पर्यंत सुरूच होता.
दरम्यान, शितलने एकांतात भेटण्यासाठी म्हणून व्यापाऱ्याला हातकणंगले येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे व्यापारी व शितल एकत्र भेटताच काही वेळात मंगल, शिवानंद, बबलू आणि रियाज हे चौघे त्या ठिकाणी आले. त्यांनी व्यापाऱ्याला तू हिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवून हिची देखभाल कर, तुझ्या घरी घेऊन जा; अन्यथा तुझी बदनामी करू, अशी धमकी देत मारहाण केली. तसेच सात लाख रुपयांची खंडणी मागितली. अखेर चार लाखांवर त्यांच्यात तडजोड झाली. त्यानुसार व्यापाऱ्याने वेळोवेळी दोन लाख रुपये दिले.
परंतु पुन्हा उर्वरित दोन लाख रुपयांसाठी २७ जूनला धमकी देऊन तगादा लावला. या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच जणांना अटक केली. त्यांच्यावर खंडणी, मारामारी, सोशल मीडियाचा गैरवापर, फसवणूक, आदी कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.
सापळा रचून अटक
नाजूक प्रकरण असल्याने यातून बदनामी होईल, या भीतीने संबंधित व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हता. पोलिसांनी त्याची समजूत काढून नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर त्याला तक्रार देण्यास प्रवृत्त केले. तसेच सापळा रचून या पाच जणांच्या टोळीला अटक केली.