कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी हिमाचल प्रदेशातून मदत, मंडी येथील आयआयटीशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:20 IST2025-04-19T13:19:45+5:302025-04-19T13:20:26+5:30

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करण्यासाठी आता हिमाचल प्रदेशातून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे. यासाठी ...

Himachal Pradesh provides assistance for Kolhapur's disaster management, agreement with IIT Mandi | कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी हिमाचल प्रदेशातून मदत, मंडी येथील आयआयटीशी करार

कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी हिमाचल प्रदेशातून मदत, मंडी येथील आयआयटीशी करार

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करण्यासाठी आता हिमाचल प्रदेशातूनकोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी मंडी हिमाचल प्रदेश या केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान संस्थेसोबत शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली.

विशेष म्हणजे यासाठी कोल्हापूरचे सुपुत्र आयआयटी मंडीच्या वित्त विभागाचे अधिष्ठाता डॉ. सत्त्वशील रमेश पवार यांनी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जंगलात लागणारे वणवे अशा नैसर्गिक आपत्ती घडतात. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची धार्मिक ठिकाणेही जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आपत्तीविषयी सज्जता महत्त्वाची ठरते. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या विषयातील नावीन्यपूर्ण योजना तसेच प्रकल्प राबविण्यामध्ये अग्रेसर आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील पूरस्थितीमध्ये आपत्ती प्रवणता कमी करण्यासाठी, जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचा पथदर्शी प्रकल्प, जागतिक बँकेच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबविला जाणारा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प यासाठीही हा करार उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

देशभरात आठव्या क्रमांकावर आयआयटी मंडी

भारतीय तंत्रज्ञान संस्थांचं केंद्र शासनामार्फत जी वर्गवारी आणि मानांकन केले जाते या मानांकनामध्ये नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यामध्ये आयआयटी मंडी या संस्थेचा पूर्ण देशभरात आठवा क्रमांक लागतो. या संस्थेकडे अतिउच्च स्वरूपाचे प्रगत तंत्रज्ञान त्याचबरोबर तंत्रशुद्ध प्रशिक्षित असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. या संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना शासकीय विभागांना तांत्रिक मदत करण्याचे काम केले जाते.

उत्तरेश्वर पेठेतील डॉ. सत्त्वशील पोवार

आयआयटी मंडी येथे वित्त विभागाच्या अधिष्ठाता पदी कार्यरत असलेले डॉ. सत्त्वशील पोवार हे उत्तरेश्वर पेठेतील गवत मंडईजवळ राहतात. विद्यापीठ हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल येथून शिक्षण घेतलेल्या पोवार यांनी केआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्यानंतर स्वीडन, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर येथे शिक्षण आणि काही काळ नोकरी करून २०१५ मध्ये ते आयआयटी मंडी येथे रुजू झाले. शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त विद्युत अभियंता रमेश पोवार यांचे ते चिरंजीव होत. ते म्हणाले, आम्ही स्वत:च पूरग्रस्त आहोत, त्यामुळे आपल्या शहर, जिल्ह्यासाठी आपत्ती काळात मी मदत करू शकतो, याचे समाधान आहे.

Web Title: Himachal Pradesh provides assistance for Kolhapur's disaster management, agreement with IIT Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.