: वस्त्रोद्योग महासंघासोबत झालेल्या बैठकीत आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्यातील वस्त्रोद्योगाला दिलासा देण्यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांच्याकडून सूतगिरण्यांना उच्च दर्जाचा कापूस किफायतशीर दरात पुरवठा करण्याच्या आश्वासनाबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सूतगिरण्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका अध्यक्ष प्रदीपकुमार अग्रवाल यांनी घेतली.
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने वस्त्रोद्योगाच्या सद्य:परिस्थितीसह कापूस दरासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या बैठकीत सहकारी सूतगिरण्या व इतर लहान सूतगिरण्यांकडून दोन लाख रुपयांची अनामत रक्कम महामंडळ घेणार नाही, शेड्युल्ड बॅँकेच्या ३० ते ५० दिवस कालावधीच्या पतप्रत्र (एल.सी.) नुसार डिलिव्हरी देण्याचे मान्य केले. कापूस खरेदीवर प्रतिखंडी ३०० रुपये परतावा देणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये महासंघाकडून परताव्यामध्ये एक हजार रुपयांपर्यंत वाढ मागण्यात आली. यासह कापूस खरेदीची निविदा मान्य झाल्यानंतर भरावी लागणारी अनामत रक्कम २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत व ५ दिवसांपर्यंत सूतगिरण्यांना भरण्यासाठी सवलत देण्याचे मान्य केले. त्यामुळे आता सूतगिरण्यांना ''''अच्छे दिन'''' प्राप्त होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. बैठकीस वित्तीय संचालक ललितकुमार गुप्ता, मुख्य सरव्यवस्थापक एस. के. पानिग्रे, व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, तांत्रिक अधिकारी गणेश वंडकर, सांख्यिकी सहायक अमिर मुजावर उपस्थित होते.
चौकट
सूत दरही स्थिर होणे गरजेचे
सूतगिरण्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना न्याय मिळून कापूस खरेदीसाठी व त्याचे दर स्थिर करण्यासाठी नियोजन लागल्यास यंत्रमागधारकांचे सूत दर स्थिर करण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी मार्ग निघण्याची शक्यता आहे. सूत दर स्थिर करण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
(फोटो ओळी)
०३१२२०२०-आयसीएच-०६
सूतगिरण्यांच्या सवलतीसंदर्भात भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष प्रदीपकुमार अग्रवाल, वित्तीय संचालक ललितकुमार गुप्ता व मुख्य सरव्यवस्थापक एस. के. पानिगे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी चर्चा केली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, तांत्रिक अधिकारी गणेश वंडकर, सांख्यिकी सहायक अमिर मुजावर उपस्थित होते.