A hero who rescues flood victims from the waves of the floods | महापुराच्या लाटांशी झुंज देत पूरग्रस्तांना वाचवणारा नायक--धुळाप्पा आंबी
महापुराच्या लाटांशी झुंज देत पूरग्रस्तांना वाचवणारा नायक--धुळाप्पा आंबी

ठळक मुद्देसात दिवस नावेतून अखंड मदतकार्य । अनेक पूरग्रस्तांनी जिगरबाजपणाला केला सलाम८ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट या काळात धुळाप्पा यांनी आपल्या मनगटाच्या कौशल्यावर वल्हे मारून एकावेळी ३० पूरग्रस्तांना स्थलांतरित केले. आलास ते कवठेगुलंद माळ असा त्यांचा प्रवास होता.

संदीप बावचे ।

धुळाप्पा म्हणजे देवदूतच..
शिरोळ तालुक्यात एनडीआरएफसारखी सरकारी यंत्रणा आली. अशा पथकांनी देखील पूरग्रस्तांसाठी बचावकार्य केले. मात्र, त्यापूर्वी धुळाप्पा यांनी परिस्थिती ओळखून प्रसंगावधान दाखवून आपली सेवा दिली. नौका चालविण्याच्या व्यवसायाशी प्रामाणिक बांधीलकी जोपासून मोठ्या जिद्दीने धुळाप्पा आंबी यांनी केलेले मदतकार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. आपत्तीचे निवारण करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनावर जोर देणाºया सरकारने धुळाप्पा आंबी यांच्यासारख्या देवदूताची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा हजारो पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहे.


जयसिंगपूर : २००५ मध्ये महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यात २०१९ च्या महापुराने विध्वंसकारी असे नवे रेकॉर्ड केले आहे. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या पाणीपातळीत जीव वाचविण्यासाठी धडपडणारे अनेकजण पुरातून बचावले असले तरी असे बचावकार्य करणाऱ्यांची धैर्याची कर्तबगारी आता समोर येत आहे. एनडीआरएफ, लष्कर, नौदलाचे जवान दाखल होण्यापूर्वी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना पैलतीरी पोहोचविणाºया आलास (ता. शिरोळ) येथील धुळाप्पा आंबी या जिगरबाज नावाड्याने सुमारे पाच हजार पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचवून जिगरबाज कामगिरी बजावली आहे.

शिरोळ तालुक्यात महापुराचे पाणी वाढत राहिले. अनेक गावे पाण्याखाली गेली. महापुराचा प्रलय निर्माण झाला. नद्यांच्या पाणीपातळीने धोक्याची पातळी कधीच ओलांडली होती. असा अभूतपूर्व जलप्रलय निर्माण झाल्यानंतर सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत झाली. शिरोळ तालुक्यातील या प्रलयाची भीषणता अधिक होती. अशा प्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल अशी पथके नागरिकांच्या मदतीसाठी धावली. अर्थात सरकारची यंत्रणा तालुक्यात कार्यरत झाली. तथापि, त्यापूर्वीच वाढणाºया पाण्याची धास्ती घेतलेले अनेकजण जिवाच्या आकांताने चिंताग्रस्त होते. गाववेशीवर येणारे पाणी अगदी कमी काळातच गावात शिरले होते. अनेक गावांतील शेकडो कुटुंबीयांची झोप उडाली होती. एका रात्रीतच काही गावांना महापुराचा वेढा बसला होता.या संकटात पूरग्रस्तांसाठी धावून आलेल्या धुळाप्पा आंबी या नावाड्याची धैर्यगाथा उल्लेखनीय ठरली आहे.

आंबी हे आलासमधील सर्वसामान्य ग्रामस्थ. कुटुंबातील पूर्वापार चालत आलेला नावाड्याचा व्यवसाय करणारे ते खºया अर्थाने हजारो पूरग्रस्तांसाठी जणू देवदूतच ठरले. धुळाप्पा यांना नदीच्या पुराचा सामना करण्याचे कौशल्य आत्मसात आहे नावाडी असल्याने पुराच्या पाण्यातून यशस्वीपणे नाव हाकण्याचा त्यांचा अनुभवदेखील मोठा आहे. आता आलाससह अनेक गावांना महापुराने वेढल्यानंतर धुळाप्पा यांचे घरदेखील पुरात गेले होते. मात्र, स्वत:चे दु:ख बाजूला सारून त्यांनी पूरग्रस्तांना मदतकार्य केले. आलास ते अकिवाट दरम्यान दैनंदिन नाव चालविण्याचे काम करणाºया धुळाप्पा यांना अनेकजण धान्याच्या स्वरूपात मोबदला देतात. यातून या भागातील जनतेशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. महापुराच्या संकटातून हजारो ग्रामस्थांना वाचविण्यासाठी त्यांनी मोठ्या धाडसाने या जलप्रलयात नाव हाकली. महापुराच्या पाण्याला मोठा वेग असतानाही अव्याहतपणे ८ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट या काळात धुळाप्पा यांनी आपल्या मनगटाच्या कौशल्यावर वल्हे मारून एकावेळी ३० पूरग्रस्तांना स्थलांतरित केले. आलास ते कवठेगुलंद माळ असा त्यांचा प्रवास होता.

अहोरात्र पूरग्रस्तांना वाचवण्याची धडपड
सामान्यपणे नदीत नाव हाकणे आणि महापुरात नाव चालविणे यात जमीन-अस्मानाचा फरक. मात्र, धुळाप्पा यांनी आपले कौशल्य पणाला लावून सुमारे पाच हजार पूरग्रस्तांना सुरक्षितपणे स्थलांतरित केले. दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा बारा तासांत मिळेल ते खाऊन कशाचीही तमा न बाळगता त्यांनी पूरग्रस्तांना जीवदान दिले. २००५ च्या प्रलयातदेखील धुळाप्पा यांचे वडील नरसिंगा यांनी असेच मदतकार्य केले होते. यावेळी धुळाप्पा यांनीदेखील अशीच सेवा दिली. त्यांचा मुलगा योगेश तसेच सादात पठाण, राजू पठाण, साहेबवाले, अन्य काही युवकांनी त्यांना साथ दिली. सुमारे तीन किलोमीटर महापुराच्या पाण्याचे अंतर पार करून त्यांनी आपल्या नावेच्या साहाय्याने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी पोहोचविले.

 


Web Title: A hero who rescues flood victims from the waves of the floods
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.