कोल्हापुरातील शेंडापार्क येथील कुष्ठधामच्या हेरिटेज वास्तू बेवारस; राजाराम छत्रपतींनी दिली होती ५५१ एकर जमीन, आता केवळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:29 IST2025-10-28T16:28:41+5:302025-10-28T16:29:37+5:30
सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभागाने झटकली जबाबदारी

कोल्हापुरातील शेंडापार्क येथील कुष्ठधामच्या हेरिटेज वास्तू बेवारस; राजाराम छत्रपतींनी दिली होती ५५१ एकर जमीन, आता केवळ...
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर सात महिन्यांनंतर मार्च महिन्यात शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शेंडापार्क येथील कुष्ठधामच्या हेरिटेज वास्तूला पहाटे आग लागली. ती कोणी लावली याचे गौडबंगाल केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रमाणेच कायम आहे. यासंदर्भात फिर्याद दिली होती, मात्र या इमारतीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागानेही झटकल्यामुळे या वास्तूला सरकार दरबारी कोणी वालीच नसल्याने बेवारस झाल्याचे चित्र आहे.
शेंडापार्क परिसरात १९४४ मध्ये राजाराम छत्रपतींनी कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी ५५१ एकर जमीन देऊन कुष्ठधामची स्थापना केली. आता केवळ ९७ एकर जमीन उपलब्ध आहे. याच जागेत कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठधाम बांधले. मात्र गेल्या वर्षभरापासून येथील बाह्यरुग्ण विभाग बंद आहे. ६ ऑगस्ट २००७ रोजी तेथील १८ कर्मचाऱ्यांना इतरत्र वर्ग करून अन्नधान्य व औषधांचा पुरवठा थांबविला आहे.
दरम्यान, मार्च २०२५ मध्ये या दुमजली इमारतीला आग लागल्याने त्यात दगडी इमारतीचे रुफ, जिना व आतील साहित्य जळून नष्ट झाले. यासंदर्भात युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशनने ११ सप्टेंबर रोजी केलेल्या आंदोलनानंतर यातील गोआश्रम तसेच भटक्या गायींची व्यवस्था करणे अधिकार कक्षात येत नसल्याचा खुलासा जिल्हा परिषदेने केला आहे. याच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासकीय पातळीवर कोणीच पुढाकार घेत नाही. याची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडील पीआरबी रजिस्टरला असून देखभाल व दुरुस्ती बांधकाम विभागाकडील अनुदानातून होते.
शेंडापार्क येथील कुष्ठधामातील कुष्ठ रुग्णांच्या शुश्रूषेकरिता जिल्हा परिषद सेवाभाव म्हणून सेवा दिली जाते. तेथील गोआश्रम व भटक्या गायींची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या अधिकारात नाही. -डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
ही वास्तू हेरिटेज आहे. याचा संवर्धन आराखडा, डागडुजीची कामे करण्यासाठी विचारणा केली असता, आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले आहे, तर बांधकाम विभागाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने याला सध्या वाली नाही. -राहुल चौधरी, अध्यक्ष, युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशन.