‘हेल्पलाईन’ वीस मिनिटांत घटनास्थळी
By Admin | Updated: May 31, 2014 00:39 IST2014-05-31T00:37:12+5:302014-05-31T00:39:32+5:30
कुची अपघात : ‘कटर’मुळे अनेकांचे वाचले प्राण

‘हेल्पलाईन’ वीस मिनिटांत घटनास्थळी
सांगली : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आज, शुक्रवारी पहाटे रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर एस.टी. बस आदळल्याने झालेल्या भीषण अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सांगलीची ‘हेल्पलाईन’ टीम अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. टीमकडे ‘रेस्क्यू आॅपरेशन कटर’ असल्याने बसचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढता आले, तसेच गंभीर जखमींचे प्राण वाचविता आले. आज पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. ५.२५ वाजता ‘हेल्पलाईन’ टीमला या मार्गावरून प्रवास करणार्या लोकांनी या अपघाताची माहिती दिली. टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, त्यांचे सहकारी सागर भानुसे, अविनाश पवार व अभिषेक लिमचे तातडीने रवाना झाले. अवघ्या २० मिनिटांत (पावणेसहा वाजता) ते घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कवठेमहांकाळ पोलीस पोहोचले होते. बस प्रचंड वेगाने ट्रकवर डाव्या बाजूने आदळली होती. यामुळे ही बाजू फाटून गेली होती. या बाजूला बसलेल्या प्रवाशांपैकी चारजण ठार झाले, तर २० जण गंभीर जखमी झाले. जखमी व मृत बसच्या फाटलेल्या पत्र्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढणे कठीण बनले होते. हेल्पलाईन टीम दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या ‘रेस्क्यू आॅपरेशन कटर’चा उपयोग झाला. या टीमने मृत व जखमींना कटरच्या मदतीने पत्रा कापून बाहेर काढले. एका जखमी महिलेचे तर दोन्ही हात व पाय तुटले होते. त्यांना लवकर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. टीमने अवघ्या १५ मिनिटांत बचावकार्य पूर्ण केले. मृत व जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर टीमने अपघातग्रस्त बस तेथून हलविली. आयुक्तांनी दिले कटर ‘हेल्पलाईन’ टीमचे उल्लेखनीय काम पाहून सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी ‘रेस्क्यू आॅपरेशन कटर’ दिले आहे. पूर्वी हे कटर अग्निशामक दलाकडे होते. हे कटर असल्यामुळे मृत व जखमींना बसचा पत्रा कापून बाहेर काढता आले. पूर्वी हातोडा व छन्नीने ठोकून पत्रा कापला जात होता. मात्र, आयुक्तांनी कटर दिल्याने ही गैरसोय आता दूर झाली आहे. मिरजेतील कर्मचार्यांची संवेदनशीलता कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या एस.टी.बस व ट्रकच्या अपघातातील जखमींवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एस.टी.च्या मिरज आगारातील अधिकारी व कर्मचार्यांच्या संवेदनशीलतेने जखमी प्रवाशांना नातेवाईक येईपर्यंत आधार मिळाला. जखमींच्या नातेवाइकांना तातडीची आर्थिक मदतही देण्यात आली. (प्रतिनिधी)