हातकणंगलेत भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: July 11, 2014 00:34 IST2014-07-10T23:36:02+5:302014-07-11T00:34:01+5:30
उपाययोजना हव्यात : जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पाऊस

हातकणंगलेत भीषण पाणीटंचाई
दत्ता बिडकर ल्ल हातकणंगले
हातकणंगले तालुक्यामध्ये १ जून ते ८ जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. हातकणंगले तहसीलदार दीपक शिंदे यांनी प्रत्येक गावातील तलाठी यांना, तर सभापती शुक्राना मकानदार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पिण्याच्या पाणीटंचाईची वस्तुस्थिती आणि उपाययोजनांबाबात तत्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी टंचाई निवारण विभागाने आडमुठे धोरण स्वीकारत तालुक्यामध्ये १५ वर्षांपूर्वी टॅँकरने पाणीपुरवठा झालेले एकही गाव नसल्यामुळे पाणीटंचाईच नाही असे धोरण स्वीकारत, तालुक्यातील २२ गावे आणि ११० वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. १ जूनपासून ८ जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे जमिनीची पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. जमिनीची पाणीपातळीच खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट तालुक्यातील प्रत्येक गावात निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाने २२ गावे आणि ११० वाड्या-वस्त्यांवरील प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर सभापती शुक्राना मकानदार यांनी पुन्हा पुरवणी अहवाल पाठविला. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती आणि कूपनलिका दुरुस्त करणे याचा खर्च न पेलवणारा असल्याने तालुक्यातील ३ गावे आणि ४८ वाड्या-वस्त्यांवर शासनाने यापूर्वी खुदाई केलेल्या कूपनलिका विशेष दुरुस्ती निधीतून दुरुस्त करून, चालू करून द्याव्यात ही मागणीही जिल्हा टंचाई निवारण प्रशासनाने मंजूर केली नाही. टंचाईग्रस्त गावांमध्ये पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली आहे. पाणी मिळवायचे कसे व शेती कशी करायची, असा प्रश्न आहे.