राजाराम लोंढेकोल्हापूर : यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अजून पाऊस कमी असला, तरी शेतकऱ्यांचे नुकसान अधिक झाले आहे. मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले, तर ऑगस्टमध्ये अतिव, पूराने कंबरडे मोडले. दोन्ही वेळेला ४६ हजार ८४३ शेतकऱ्यांचे १० हजार ७०४ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १७.७३ कोटीचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे केले पण, भरपाई कधी मिळणार? मे मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही.साधारणता कोल्हापूर जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात तुलनेत अधिक पाऊस होऊन अतिवृष्टी, महापुराने शेतकऱ्यांचे नुकसान होते. पण, यंदा मान्सूनपूर्व पावसानेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. उन्हाळी पिकांना फटका बसून भुईमूग, भाजीपाला, सुर्यफुल, उन्हाळी भात या पिकांचे नुकसान झाले. मे महिन्यातील पावसाने जिल्ह्यातील १० हजार २८४ शेतकऱ्यांचे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे, पण अद्याप एक दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.पहिली नुकसानभरपाई मिळायची आहे, तोपर्यंत ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांचे ८८३५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १४ काेटी २८ लाखांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांनी यांनी एकत्रीतरित्या केले आणि त्याचा अहवालही शासनाला सादर केला आहे.
मे व ऑगस्ट महिन्यात असे झाले तालुकानिहाय नुकसान हेक्टर, कंसात रक्कम लाखाततालुका - मे (हेक्टर) (रक्कम) - ऑगस्ट (हेक्टर) (रक्कम)
- करवीर - ३०५.३७ (६६.११) - ९९८.४० (१६०.८३)
- कागल - २२.७३ (४.२५) - १०८६.८३ (१७०.४६)
- राधानगरी - १२३.८७ (२३.९१) - १४६६.०१ (२८५.४९)
- गगनबावडा - ३९.९५ (११.७२) - ४९०.४० (८२.३१)
- पन्हाळा - ३५८.२६ (६१.७१) -
- शाहूवाडी - १५४.१६ (२८.५७) - ३७९.५० (६३.०४)
- हातकणंगले - १९५.३५ (३३.२०) - ७१४.३० (७८.५७)
- शिरोळ - ५०५.२७ (८६.०२) - ३१२०.०० (४८६.४५)
- गडहिंग्लज - ५.८० (१.०३) -
- आजरा - ५.५८ (१.३०) - १०४.५० (१७.५४)
- चंदगड - ६४.८६ (११.०५) - ०.३२ (०.०२७२०)
- भुदरगड - ८७.२५ (१५.२९) - ४७४.८९ (८३.७७)
जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांंचे संयुक्त पंचनामे झालेले आहेत. नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. - नामदेव परीट (उपसंचाक, कृषी विभाग)